गांजासह अमली पदार्थ विक्रीचे अड्डे सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:07 AM2018-12-27T04:07:40+5:302018-12-27T04:07:53+5:30

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गांजासह अमली पदार्थ विक्रीचे बहुतांश सर्व अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. माफियांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना अपयश आले आहे.

With the help of ganja, there was no substitute for sale of drugs, neglect of police | गांजासह अमली पदार्थ विक्रीचे अड्डे सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष

गांजासह अमली पदार्थ विक्रीचे अड्डे सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई -  नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गांजासह अमली पदार्थ विक्रीचे बहुतांश सर्व अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. माफियांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना अपयश आले आहे. कारवाईचे प्रमाणही घसरले आहे. तरुणाईला व्यसनांच्या जाळ्यात अडकविले जात असूनही प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

खारघर सेक्टर १० मध्ये अनधिकृत भंगार दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकास मंगळवारी ७० ग्रॅम गांजा सापडला. अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकूर यांनी ही घटना उघडकीस आणली असून गांजाच्या सात पुड्यांसह विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या घटनेमुळे नवी मुंबईसह पनवेलमधील गांजासह अमली पदार्थ विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जून २०१६ मध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम राबविली होती. नेरूळ, सानपाडा, एपीएमसी, तुर्भे, इंदिरानगर, शिवाजीनगर, पनवेल व उरण परिसरातील प्रमुख अड्डे बंद केले होते. पण त्यांची बदली झाल्यानंतर कारवाईमध्ये शिथिलता आली.

काही मोठ्या कारवाया झाल्या असल्या तरी त्याचा परिणाम शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर झालाच नाही. एपीएमसीमधील टारझन वगळता इतर सर्वांचे अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत. टारझनच्या टोळीतील मुलांनी इतर ठिकाणी गांजा विक्री सुरूच ठेवली आहे. सद्यस्थितीमध्ये सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा येथील पांडेचा अड्डा पूर्ववत सुरू झाला आहे. धान्य मार्केटसमोरील झोपडी, इंदिरानगर, तुर्भे, नेरूळ बालाजी टेकडीचा पायथा येथे पूर्ववत विक्री सुरू झाली आहे.

बेलापूर रेल्वे स्टेशनसमोरील झोपडपट्टीमध्येही अद्याप अमली पदार्थाची विक्री सुरूच आहे. हनुमाननगरमधील बंद झालेल्या अड्ड्यावर पुन्हा अमली पदार्थ मिळू लागले आहेत. या व्यवसायाची माहिती असणाºया सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे उलवेमध्ये सद्यस्थितीमध्ये सर्वाधिक गांजा विक्री होवू लागली आहे. नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दिघा येथील अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर अद्याप कधीच कारवाई झालेली नाही. नवी मुंबईच्या तुलनेमध्ये पनवेलमध्ये गांजा विक्री करणे अधिक सुलभ होवू लागले आहे. अमली पदार्थ विरोधी पथक फारसे लक्ष देत नाही व स्थानिक पोलीस स्टेशन कारवाई करत नसल्यामुळे उघडपणे विक्री होवू लागली आहे. सद्यस्थितीमध्ये मानसरोवर रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टी, नवीन ग्रामीण रुग्णालयाजवळ, खारघर व तळोजा परिसरामध्ये गांजाची विक्री सुरू आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्यासाठी माफियांचे प्रयत्न सुरू आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया शहरातील हे अड्डे मुळापासून उखडून टाकावे, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे.

पोलिसांचा वचक राहिला नाही
शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांना पोलिसांची भीती वाटत नाही. यापूर्वी शहाजी उमाप परिमंडळ एकचे उपआयुक्त असताना शहरातील सर्व अड्डे बंद झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख असतानाही जवळपास सर्व प्रमुख अड्डे बंद झाले होते. परंतु काही महिन्यांपासून कारवाईचे प्रमाण कमी झाल्यामुळे विक्रेत्यांनी पुन्हा त्यांचे हातपाय पसरले असून काही ठिकाणी खुलेआम तर काही ठिकाणी चोरून विक्री सुरू आहे.

दहशत पसरविण्याचा प्रयत्न
इंदिरानगर परिसरातील बगाडे कंपनीजवळ काही महिन्यांपासून गांजा विक्री सुरू आहे. याठिकाणी गांजा खरेदीसाठी नवी मुंबईच्या विविध भागातून तरुण येत असतात. येथे गांजा विक्री करणाºयांबरोबर गुंड प्रवृत्तीचे तरुण फिरत असतात. ते मारामारी करून व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगून दहशत पसरवत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या मारामारीच्या घटनेच्यावेळी एक गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने गोळी घालून ठार करण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

नागरिकांवर घर विकण्याची वेळ
नेरूळमधील बालाजी टेकडीच्या पायथ्याशी झोपडीमध्ये अनेक वर्षांपासून गांजा विक्री होत आहे. सावित्री सोसायटीला लागून ही झोपडी आहे. गांजा विक्रेत्यावर पोलीस कारवाई करत नाहीत व झोपडीवर सिडकोसह महापालिका कारवाई करत नाही. यामुळे येथील सावित्री,अरिहंत कृपा, अरिहंत व्हिला, हरीओम पुष्प इमारतीमधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. गांजा विक्रेत्यांना कंटाळून अनेकांनी घरे विकण्यास सुरवात केली आहे. पोलिसांवरील नागरिकांना विश्वास पूर्णपणे उडाला आहे. पोलिसांकडे तक्रारी करून काहीही उपयोग होत नाही.

Web Title: With the help of ganja, there was no substitute for sale of drugs, neglect of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.