नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाने दिलेली मदत म्हणजे कोकणवासीयांची क्रूर थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 02:02 AM2020-08-02T02:02:09+5:302020-08-02T02:02:37+5:30
मुरुड संघर्ष समिती व बागायतदार आक्रमक । मुख्यमंत्र्यांसह इतरांनाही पाठविले निवेदन
आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील नारळ, सुपारी, आंबा आदी बागायती पार उद्ध्वस्त होऊन बागायतदारांचे दहा ते बारा वर्षांत भरून येणार नाही, एवढे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने नुकसान भरपाई म्हणून नारळ प्रति झाड २५० रुपये सुपारी प्रति झाड ५० रुपये देऊन कोकणवासीयांची क्रूर थट्टाच केली आहे, असा आरोप करून मुरुडच्या संघर्ष समिती व बागायतदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सदर नुकसान भरपाईबाबत पुनर्विचार करण्याची मागणी एका निवेदनाजद्वारे केली आहे.
सदर बागायतदारांना शासनाने कांदा-बटाट्याच्या दरात अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई दिली आहे. एका सुपारीच्या झाडापासून वार्षिक उत्पन्न १००० रुपये, नारळाच्या झाडापासून २००० रुपये, आंबा ८ ते दहा हजार, फणस, चिकू, पेरू आदीपासून १००० ते १२००रुपये, तर केळीच्या झाडापासून ५०० रुपये उत्पन्न मिळते. कोकणातील बहुतांशी बागायतदारांचे ते उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन आहे. कांदा-बटाट्याचे पीक वर्षातून दोनदा येते, परंतु सुपारी, नारळ, आंबा पिकांना दहा ते बारा वर्षे लागतात. म्हणजेच एवढ्या वर्षाचे उत्पन्न बुडाल्यात जमा आहे.
मुरुडमधील पंचनामे योग्य तºहेने केले गेलेले नाहीत. शासनाने दिलेली भरपाई ही कोणत्या कृषी तज्ज्ञाकडून माहिती घेऊन दिलेली आहे, असा सवालही करण्यात आला आहे. निवेदनाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे यांना पाठविण्यात आल्या आहेत.
असे झाले आहे
नुकसान
नुकसानग्रस्त झालेली नारळाची झाडे तोडून उचलण्यास प्रत्येकी
2000
रुपये,
सुपारी झाडास
100
रुपये प्रत्येक झाडाला,
तर आंबा व अन्य झाडांस
4000
रुपये
असा खर्च झाला आहे. त्या मानाने दिलेली भरपाई ही अत्यंत तुटपुंजी आहे.