प्रामाणिक हेतूला गवसले सहकार्याचे हात , वढाव गावच्या १८१ महिलांचे श्रम झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:22 AM2019-05-08T02:22:21+5:302019-05-08T02:22:46+5:30
पाणी उपलब्ध करण्यासाठी पेण तालुक्यातील तीव्र जलदुर्भिक्षाच्या खारेपाटातील वढाव गावातील तब्बल १८१ महिला एकत्र आल्या
- जयंत धुळप
अलिबाग - पाणी उपलब्ध करण्यासाठी पेण तालुक्यातील तीव्र जलदुर्भिक्षाच्या खारेपाटातील वढाव गावातील तब्बल १८१ महिला एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या गावातील तब्बल सहा एकरांचा तलाव खोदून त्यातील गाळ काढण्याचे काम तळपत्या उन्हात सामूहिक श्रमदानातून सुरू केले,तसेच तलावाच्या संरक्षक भिंती बांधण्यासह अन्य कामाकरिता अपेक्षित ३० लाख रुपये उभे करण्याकरिता आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गेल्या शुक्रवारी प्रसिद्ध केले. हेतू प्रामाणिक असेल तर सहकार्याचे हात आपोआपच पुढे येतात आणि समस्येतून मार्ग निघतो, याची प्रचिती वढाव गावच्या या १८१ कष्टकरी महिलांना सोमवारी आली.
वढाव गावातील पाण्यासाठी तलावातील गाळ काढण्याकरिता श्रमदान करणाऱ्या गावदेवी ग्राम विकास संस्थेच्या १८१ महिलांना भेटण्याकरिता पेणमधील आई डे केअर गतिमंद मुलांच्या शाळेच्या संचालिका आणि पेण इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती मोहिते वढाव गावात आल्या, त्यांनी त्यांना विविध पुरस्काराच्या रूपाने मिळालेल्या रकमेपैकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिल्याचे गावदेवी ग्राम विकास संस्थेच्या अध्यक्षा हेमलता म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान, वढाव गावातीलच एक दानशूर सचिन ठाकूर यांनी देखील १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
स्वाती मोहिते यांनी पेणमधील रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे संचालक राजू पिचिका यांची तत्काळ भेट घेतली. वढाव गावातील महिलांच्या श्रमदानाची संपूर्ण कथा त्यांना सांगून, त्यांचे पोकलेन मशिन तलावाचा गाळ काढण्याकरिता मिळावे, डिझेलचा खर्च त्या महिला करतील, अशी विनंती केली आणि त्यांनी मोहिते यांची विनंती मान्य केली. सोमवारी सकाळीच एका ट्रेलरवरून पिचिका यांच्या पोकलेन मशिनसह स्वाती मोहिते वढाव गावात दाखल झाल्या. पेण येथून वढावमध्ये पोकलेन मशिन आणणे व काम झाल्यावर परत नेण्याचा ५० हजारांचा खर्चही पिचिका यांनीच केला आहे. शिवाय, पोकलन चालकाचा पगारही तेच देणार आहेत.
त्यांच्या रूपाने आम्हाला देवच भेटला...
आमच्या गावदेवीकडे प्रार्थना करून श्रमदानास सुरुवात करीत होतो आणि देवाने आमचे साकडे मान्य करून स्वाती मोहिते आणि राजू पिचिका यांच्या रूपाने देवच आम्हाला दिसल्याची भावना आम्हा सर्व महिलांची आहे. ज्यांना आम्ही कधीही पाहिलेलेही नाही, ज्यांनी आम्हालाही पाहिलेले नाही, ओळख असण्याचे काही कारणही नाही अशा माणसाने त्यांचे पोकलेन मशिन पूर्णपणे मोफत आम्हाला उपलब्ध करून दिले, अशा परिस्थितीत ते आमच्यासाठी देवापेक्षा आणखी काय असू शकतात, अशी भावना गावदेवी ग्राम विकास संस्थेच्या अध्यक्षा हेमलता म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सरकारी यंत्रणा मात्र अद्याप सुस्तच
आमची ग्रामपंचायत वा अन्य कोणतीही सरकारी यंत्रणा यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारे आम्हाला मदत मिळालेली नाही. रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड जरी करून मिळाली तरी आम्हाला रोहयोतून मिळू शकणारी मजुरी आम्ही संरक्षण भिंतींच्या कामासाठी वापरू शकू, अशी अपेक्षा म्हात्रे यांनी अखेरीस व्यक्त केली आहे.
जेएसडब्ल्यू कंपनी करणार सहकार्य
तलावाच्या नादुरुस्त भिंती पाडून त्यातील दगड वेगळे करण्याचे काम मशिन करणार आहे. यामुळे दगड विकत घेण्यात बचत होईल. वढाव गावकीने एक लाख ८० हजार रुपये या कामासाठी मंजूर करून, त्यातील एक लाख रुपये प्रत्यक्ष दिले आहेत, तर ८० हजार रुपये दुसºया टप्प्यात देणार आहेत. मशिनने काढलेला गाळ वाहून नेण्याकरिता दोन डम्पर भाड्याने घेतले आहेत, त्याकरिता रोज १२ हजार रुपये खर्च आहे. गाळ काढल्यावर तलावाच्या संरक्षण भिंती बांधण्याचे मोठे खर्चिक काम आहे. त्यासाठी काही रक्कम देण्याची तयारी जेएसडब्ल्यू कंपनीने दाखविली आहे, येत्या दोन-तीन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल, असे म्हात्रे यांनी सांगितले.