कर्जत : नेरळ परिसरातील टेकड्यांवर वणवे लागू नयेत, म्हणून काम करणाऱ्या सगुणा वनसंवर्धन टीमने आता माथेरान डोंगरातील टेकड्यांवर रान वनस्पती, वनौषधींची लागवड सुरू केली आहे, त्यामुळे लवकरच नेरळ, माथेरान भागातील डोंगर रान वनस्पतींनी बहरतील.सगुणा वनसंवर्धन टीमने नेरळ आणि माथेरान डोंगरातील टेकड्यांना वणवे लागू नये म्हणून मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी आतापर्यंत त्या मार्गात निवडूंग, करवंद, घायपात आदीची लागवड केली जात आहे. आता ही टीम सर्व टेकड्या आणि जंगलात रान वनस्पतींचे नव्याने संवर्धन करण्यासाठी सरसावली आहे. तीन टप्प्यात आधी घायपात, नंतर निवडूंग आणि त्यापुढे करवंदाची जाळी, अशी रचना पूर्ण झाली आहे. वन विभागाचे कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. जंगलात कमी झालेल्या रानकेळीची रोपे वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यानंतर वाळा जातीची झाडेही कमी झाली असून, त्यांचीदेखील लागवड जंगलात केली जात आहे. या दोन्ही प्रकारच्या रोपांची ४० हजार झाडे लावण्यात आली आहेत. सगुणा वनसंवर्धन टीमने आता माती आणि दगड रोखणारी, तसेच पाणी नसतानाही तग धरणारी शिंदी झाडांची रोपे लावण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी रोपे जीवशास्त्राच्या अभ्यासक अनुराधा भडसावळे यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहेत. या सर्व झाडांचा उपयोग औषधी वापरासाठी देखील महत्त्वाचा आहे.
घाटमाथ्यावर वनौषधींची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 3:59 AM