- विजय मांडे
कर्जत : जागतिक पातळीवर पुरातन ठेवा जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहिली आहे. त्याचा एक भाग म्हणून ब्रिटिशांनी वसविलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी ब्रिटिश काळातील २९५ इमारती आहेत. त्या इमारतीचे जतन करण्याचा निर्णय देखभाल समितीने घेतला आहे. मात्र नव्या पिढीला हा ठेवा पाहता यावा, त्याची भव्यता समजावी यासाठी माथेरान शहरातील हेरिटेज वास्तू नजरेखाली याव्यात यासाठी हेरिटेज वॉक नावाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लवकरच संबंधित हेरिटेज वास्तूंचे मालक यांची परवानगीची प्रक्रि या पूर्ण करून हेरिटेज वॉक ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी जाहीर केले आहे.
माथेरान हे इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर झालेले पर्यटन स्थळ विविधतेने नटलेले आहे. लाल मातीतले नागमोडी रस्ते, डोक्यावर सदैव सावली राहील अशी विपुल वनसंपदा, थंडगार हवा, आल्हाददायक हवामान, घोडेस्वारी, माथेरानची राणी म्हणून नावलौकिक मिळविलेली मिनी ट्रेन, हे सर्व अनुभवत असताना इथल्या हेरिटेज वास्तू आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत. ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारती आजही त्याच अविर्भावात उभ्या आहेत. त्या इमारती वास्तुशिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून आजही अभियांत्रिकी विभागाला आव्हान ठरत आहेत.
माथेरानमधल्या पुरातन वास्तूदेखील वास्तुशिल्प कलेचा नमुना असून त्यांचे जतन देखभाल समिती करीत आहे. या समितीने माथेरानच्या ५२ किलोमीटर भागात फिरून हेरिटेज वास्तूंची नावे निश्चित केली आहेत. तब्बल २९५ वास्तू या माथेरानच्या जंगलात हेरिटेज म्हणून समोर आल्या असून त्यांचे जतन करण्याचे काम आता हेरिटेज समिती करीत आहे.
माथेरान गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी आपल्या पालिकेचे पदाधिकारी अध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन माथेरानमधील हेरिटेज वास्तू या पर्यटकांसाठी खुल्या करून त्यांचे दर्शन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. कोकरे यांनी माथेरानमधील २९५ हेरिटेज वास्तूमधील वास्तुशिल्प कलेचा नमुना पाहता यावा यासाठी हेरिटेज वॉकची संकल्पना समोर आणली आहे.