हेटवणे धरणाची पाइपलाइन फुटून लाखो लीटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:38 PM2020-12-17T23:38:28+5:302020-12-17T23:38:39+5:30
१०६ गावांचा पाणीपुरवठा काही काळ बंद : ७० फूट उंचीपर्यंत उडाले तुषार
उरण : सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणारी दीड मीटर व्यासाची पाइपलाइन गुरुवारी (१७) अचानक फुटली. त्यामुळे प्रचंड दाबाच्या पाइपलाइनमधून ७० फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडून लाखो लीटर पाणी वाया गेले असून यामध्ये एका घराचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सिडकोच्या हेटवणे धरणातून उरण एमआयडीसी, द्रोणागिरी नोड, खारघर आदी विभागांतील १०६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणारी दीड मीटर व्यासाची पाइपलाइन चिरनेरलगत असलेल्या आयपीसीएल ब्रीजजवळ गुरुवारी दुपारी ३.३० सुमारास अचानक फुटली.
या दीड मीटर व्यासाच्या पाइपलाइनमधून ७ ते ८ किलो दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने फुटलेल्या पाइपलाइनमधून सुमारे ७० ते ८० फुटी उंचीपर्यंत पाणी उडत होते. प्रचंड वेगाने उडणाऱ्या पाण्यामुळे शेजारीच असलेल्या एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळताच सिडकोच्या हेटवणे धरण प्रकल्पाचे उपअभियंता राजेश हटवार यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाणीपुरवठा बंद केला. दीड मीटर व्यासाची पाइपलाइनवरील मेनहोल प्लेट तुटून उघडल्यानेच पाणी प्रचंड दाबाने बाहेर फेकले गेले असल्याची माहिती उपअभियंता राजेश हटवार यांनी दिली.यामध्ये एका घराचेही नुकसान झाले.
आज होणार कमी दाबाने पाणीपुरवठा
पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाच ते सात तासांत दुरुस्तीचे काम झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत उरण एमआयडीसी, द्रोणागिरी नोड, खारघर आदी विभागातील १०६ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तर शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे उपअभियंता राजेश हटवार यांनी सांगितले.