योग साधनेत हेमांगी, प्रतीक्षाची बाजी; जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:34 AM2017-09-27T04:34:49+5:302017-09-27T04:34:56+5:30
म्हसळ्यासारख्या ग्रामीण भागात केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर नेटाने सराव करून हेमांगी मेंदाडकर व प्रतीक्षा पाटील या दोघींनी मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावून योगामध्येही आपली मोहोर उमटवली आहे.
- अरूण जंगम
म्हसळा : म्हसळ्यासारख्या ग्रामीण भागात केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर नेटाने सराव करून हेमांगी मेंदाडकर व प्रतीक्षा पाटील या दोघींनी मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावून योगामध्येही आपली मोहोर उमटवली आहे.
शरीर निरोगी राखण्यासाठी, मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. योगासनांचा नियमित सराव केल्याने शरीरातील स्नायू सक्षम होतात. प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धतीतील योगासने ही अष्टांगयोगातील तिसरी पायरी मानली जाते. सद्यस्थितीत भारताने दिलेल्या या योगास आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे, तर योगासनांना क्रीडा प्रकार म्हणूनही मान्यता दिली आणि या खेळाचे क्षेत्र खुले झाले.
मन आणि शरीर यांना एकत्र ठेवणारे आसन म्हणजेच योगासन. प्राचीन काळापासून कथापुराणांमध्ये याविषयीचा उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे वैद्यकीय शास्त्रानेही, योगासनाने व्याधींवर नियंत्रण आणता येते, यास दुजोरा दिला आहे. शहरी भागांप्रमाणे आता ग्रामीण भागातही योगाचा प्रसार झाला आहे. त्यातूनच खरसई गावातील हेमांगी मेंदाडकर व प्रतीक्षा पाटील या दोघी या खेळाकडे वळल्या आहेत. योगासनांच्या सरावाकरिता कोणतीही साधनसामुग्री लागत नाही, तर मोठ्या खर्चाचीही बाजू नाही. परिणामी, घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी योगसाधनेच्या जिद्दीतून या दोघींनी प्रावीण्य संपादन केले आहे. हेमांगी मेंदाडकर हिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, प्रतीक्षा पाटील बारावीमध्ये शिकत आहे. दोघींनीही अनेक शालेय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत अनेक पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या आहेत.
१५ जानेवारी २०१७ रोजी मालवण येथे योगा कल्चर व निरामय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या राज्यस्तरीय योगा चॅम्पियन स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक मिळवले आहे. हेमांगीची २०११मध्ये मॉरिशस येथे झालेल्या वार्षिक योगा स्पर्धेसाठी निवड झाली होती; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे तिला जाता आले नाही. निराश न होता त्यांचा सरावही सुरू आहे. प्रशिक्षक हेमंत पयेर व उत्तम मांदारे यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा त्यांचा मानस आहे.