रोहा : दरोडा व घरफोडीच्या उद्देशाने मध्य प्रदेशातील एका टोळीने प्रवेश केल्याची माहिती गोपनीय विभागाकडून मिळाल्यावर शहरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. रोहा शहराचे मुख्य प्रवेशाचे मार्ग, सर्व बँका, एटीएम, ज्वेलर्सची दुकाने व अन्य मोक्याच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोलकुमार झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४०हून अधिक अधिकारी, कर्मचारी व आरसीपी जवानांचे पथक तैनात करण्यात आले आहे.शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी होत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. गुरुवारी रात्रीपासून शहरातील विविध भागांत आरसीपी जवान दाखल झाल्याने व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले. तर रात्रपाळीला जाणाऱ्या कामगारांसहित सर्वांची कसून तपासणी सुरू झाल्याने घबराटीचे वातावरण होते. शुक्रवारपासून शहरातील बँका, बस आगार आदी ठिकाणच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक शंभर ते सव्वाशे मीटर अंतरावर बंदूकधारी पोलीस व जवानांची नेमणूक करण्यात आली आहे.फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष दिले जात असून, धूमस्टाईल पद्धतीने काम करणारी झांबुआ टोळी दरोडा टाकून पळून जाते, या शक्यतेतून हा बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)
रोहा शहरात हाय अॅलर्ट जारी
By admin | Published: July 24, 2016 3:46 AM