जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिदक्षतेचा इशारा; हजारो बोटींनी टाकले नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:22 AM2019-11-05T01:22:50+5:302019-11-05T01:23:19+5:30
‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यंत : सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने प्रवासी वाहतूक थांबवली
आविष्कार देसाई
अलिबाग : ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. या कालावधीत ताशी ८० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ६०० पेक्षा अधिक मासेमारी बोटींनी नांगर टाकला आहे. प्रवासी वाहतूक करणाºया बोटींनाही वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर क्यार चक्रीवादळ आणि गेल्या चार दिवसांपासून महा चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला आहे. सोबतीला मुसळधार पाऊस असल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. अवकाळी, परतीचा पावसामुळे शेतातील पीक आडवे झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या भाताच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मासेमारी व्यावसायिकांनाही या कालावधीत मासेमारी करता न आल्याने तेही नुकसानीच्या खाईत लोटले गेले आहेत. जमिनीवरील शेतकरी आणि समुद्रातील मच्छीमार अशा अर्थव्यवस्थेतील प्रमुख दोन्ही घटकांना वादळाचा तडाखा बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असले तरी, अद्यापही प्रशासन काही ठिकाणच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. २०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकºयांसह बागायतदारांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर दोन्ही वर्षांचे मिळून तब्बल १७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे पुढे आले होते. तेव्हाच्या नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप शेतकºयांना आता करण्यात येत आहे. त्यामुळे आता सुरू करण्यात आलेल्या पंचनाम्याची आर्थिक नुकसानभरपाई तीन वर्षांनी मिळणार काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महा चक्रीवादळाची तीव्रता ८ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. त्याचप्रमाणे विजेचा कडकडाट आणि वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली. पुढील दोन दिवस सोसाट्याचा वारा वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार आहे. ताशी ८० किमीच्या वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आधीच हजारो बोटी किनाºयावर उभ्या आहेत. त्यामध्ये आज ६०० बोटींची भर पडली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. पीएनपी, मालदार, अजंठा यांच्यासह रेवस, मोरा येथे प्रवासी वाहतूक करणाºया बोटींनी प्रवासी वाहतूक करू नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत, असेही पाठक यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.