- जयंत धुळपरायगड- जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाऱ्यावरील गावांना "ओखी" चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.पुढील 48 तासात वादळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रतितास राहणार असून, समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करू नये. तसेच जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तात्काळ सुरक्षित बंदरावर आसरा घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.मंगळवार 5 डिसेंबर रोजी रात्री 00.50 मिनिटांनी (आज रात्री 1 वा.) 5.01 मीटर उंचीची समुद्रास भरती असणार आहे. त्यामुळे सखल व किनाऱ्यालगतच्या भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141 222118 / 222097 / 227452 तसेच टोल फ्री नंबर 1077 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 9:58 PM