बॉम्ब सापडल्याने रायगड जिल्ह्यात 'हाय अॅलर्ट', मोदींच्या सभेत स्फोटाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 06:12 AM2019-02-22T06:12:31+5:302019-02-22T07:45:11+5:30
कर्जत-आपटा एसटीत सापडला आयईडी बॉम्ब, लोकांना सावधानतेचा इशारा
मोहोपाडा/रसायनी : कर्जत-आपटा एसटी बुधवारी रात्री आपटा एसटी डेपोत आली असता, कंडक्टरला बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. ही वस्तू आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हा बॉम्ब निकामी केला. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला असून, लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कर्जतहून आलेली एसटी क्र मांक एम एच १४, बीटी १५९६ आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्याने माहिती देताच रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्बशोधक पथकाला या घटनेची माहिती दिली.
आणखी दोन स्फोट करण्याचा उल्लेख
१.५ किलो आरडीएक्सचा वापर करून दिल्ली-कानपूर-लखनऊ शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडविण्याच्या कथित योजनेचाही पत्रात उल्लेख आहे. दिल्ली-कानपूर महामार्गावर कानपूरपासून ३० किमी अंतरावर २७ फेब्रुवारी रोजी स्फोट केला जाणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. पण याचाही नेमका दिवस व ठिकाण लिहिलेले नाही.
मोदींच्या सभेत स्फोटाची धमकी
लखनऊ : कानपूर-कालिंदी एक्स्प्रेसमध्ये बुधवारी झालेल्या कमी शक्तीच्या स्फोटाचा तपास करताना पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी सभेत मोठा स्फोट घडवून घातपात करण्याच्या धमकीचे पत्र रेल्वेगाडीत मिळाले आहे. या पत्राचा खरेपणा तपासला जात आहे.
‘जैश-ए-मोहम्मद’च्या निनावी हस्तकाच्या नावे असलेले हे हिंदीमधील पत्र हस्तलिखित आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांच्या आगामी सभेखेरीज शताब्दी एक्स्प्रेस रेल्वेगाडीत स्फोट करण्याच्या योजनेचा उल्लेख असून हे काम फत्ते करणाºयास पाच कोटी रुपयांची बक्षिशी मिळणार असल्याचे नमूद आहे. पत्राच्या शेवटी ‘जैश’चा एजंट एवढाच उल्लेख आहे. हे पत्र कोणी कोणाला उद्देशून लिहिलेले आहे, हे मात्र स्पष्ट होत नाही. पंतप्रधानांच्या नेमक्या कुठल्या सभेत स्फोट करण्याचे ठरले आहे, याचा उल्लेख पत्रात नाही. (वृत्तसंस्था)