गणेश प्रभाळेलोकमत न्यूज नेटवर्क दिघी : दिघी ते पुणे या राष्ट्रीय महार्गावरील म्हसळा-माणगाव प्रवास धोकादायक बनला आहे. सध्या या रस्त्यावरील कामे पूर्ण होत आहेत. मात्र, अनेक पुलावरील कामे अर्धवट स्वरूपात असल्याने चारचाकी वाहनांसह दुचाकी घसरून अपघात होत आहे. महामार्गावरील प्रवास वेगवान बनला असला, तरी रस्त्याच्या पुलांवरील ‘गॅप’ तसाच असल्याने मार्ग धोकादायक ठरत आहेत.
दिघी-माणगाव महामार्गावरील रस्त्यावरील येणाऱ्या पुलांवरील जोड रस्त्यांमुळे वाहनांना दणके बसत आहेत. रस्ते तयार केल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूची साईडपट्टी व मध्येच असणारी सांधे जोडणी भरणार आहेत. मात्र, सात ते आठ ठिकाणी मुख्य रस्ता झाल्यानंतरही हा ‘गॅप’ भरून काढण्यात आलेला नाही. यामुळे संपूर्ण रस्ता उंच आणि त्याला जोडले गेलेले साकव समांतर नसल्याने, रस्त्यावर जाण्यासाठी किंवा उतरताना दुचाकीस्वारांची तारांबळ उडत आहे. दुचाकीचा तोल जाऊन अनेक ठिकाणी दुचाकीस्वार खाली कोसळून जखमी झाल्याचे प्रकारही घडत आहेत.
या सुसाट मार्गावर प्रवास करताना अनेक ओव्हरलोड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे कार, दुचाकी अशा वाहनांना रस्त्यावरून अचानक खाली आदळत उतरावे लागते. यात नुकसान होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यावरून दुचाकी खाली घेताना किंवा वरती चढवताना तोल जाण्याची भीती वाटते. त्यामुळे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सांधे जोडणी भरून काढत हा रस्ता सारख्या पातळीचा करून, कंत्राटदाराने रस्त्यांचे काम तत्काळ करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
दिघी-वेळास ८ कि.मी.चा रस्ता रखडला
n या मार्गावर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे नियंत्रण आहे. दिल्ली–मुंबई कॅरिडोर प्रकल्पात तयार होत असलेल्या दिघी पोर्टला जोडणारा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून जे.एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित होता.
n त्यानंतर, राष्ट्रीय महामार्ग बनल्यानंतर हा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. सध्या महामार्ग असलेल्या माणगाव ते दिघी मार्गावरील दिघी-वेळास या दरम्यान ८ किलोमीटर अंतराचा रस्ता वनखात्याच्या आडकाठीमुळे रखडला आहे.
दिघी-माणगाव मार्गावरील वेळास रस्त्यासाठी वनखात्याची परवानगी व काही ठिकाणी भूसंपादन झाले नसल्याने कामे रखडले आहेत.- सचिन निफाडे, उपअभियंता.