महाडजवळील महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकी हलवणार,चांढवे गावहद्दीत नवीन चौकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:47 PM2020-07-08T23:47:20+5:302020-07-08T23:48:13+5:30
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुस-या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन महामार्गासाठी महाड तालुक्यात तीळ चांढवे या गाव हद्दीत टोल नाका उभारण्यात येणार आहे.
- सिकंदर अनवारे
दासगाव - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकणाचे काम सुरू आहे. या महामार्गावर असणाºया वाहतूक शाखा पोलीस चौक्या अपघातानंतर मदतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात, वाहतुकीला होणारे अडथळेदेखील नेहमी दूर करत असतात. महाड शहरानजीक असलेली वाहतूक शाखा पोलीस चौकी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामानंतर या ठिकाणाहून हलवून तालुक्यातील चांढवे या गावहद्दीत नवीन होणाºया टोल नाक्याजवळ बांधण्यात येणार असल्याची माहिती याच विभागाकडून प्राप्त झाली आहे. जर चांढवे या ठिकाणी ती बांधण्यात आली तर जवळपास ४० किलोमीटर अंतरावर या चौकीचा मदतीसाठी काही उपयोग होणार नाही.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुस-या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन महामार्गासाठी महाड तालुक्यात तीळ चांढवे या गाव हद्दीत टोल नाका उभारण्यात येणार आहे. महाड शहरानजीक असलेली महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकीदेखील या ठिकाणाहून उचलून चांढवे गावहद्दीत बांधण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या या पोलीस चौकीअंतर्गत इंदापूर ते पोलादपूर असे ५७ किलोमीटरचे अंतर आहे. आजही इंदापूर आणि माणगाव विभागात वाहतूककोंडी किंवा अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महाडवरून वाहतूक शाखा पोलिसांना फार वेळ लागतो. इंदापूरपासून या चौकीचे अंतर जवळपास ४० किलोमीटर इतके आहे. आशा परिस्थितीत जर ही चौकी चांढवे या गावहद्दीत बांधण्यात आली तर या अंतरामध्ये पुन्हा १० किलोमीटरची वाढ होणार आहे. अशावेळी इंदापूर किंवा माणगाव विभागासाठी या चौकीचा काही उपयोग होणार नाही. अपघात प्रसंगी या चौकीपासून कोणतीही मदत लवकर मिळणे अशक्य होणार आहे.
या चौकीअंतर्गत महामार्गाचे इंदापूर ते पोलादपूर ५७ किलोमीटर अंतर आहे. पुढील चौकी मध्यवर्ती ठिकाणी आल्यास दोन्हीकडील हद्दीत लक्ष ठेवता येईल.
- वाय.एम. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा, महाड
अपघात प्रसंगी उपयोग नाही
१महाड शहरानजीक असलेली महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकी जरी नवीन महामार्ग झाला तरी एकतर त्याच ठिकाणी ठेवण्यात यावी; नाहीतर इंदापूर आणि पोलादपूर या ५७ किलोमीटर अंतराच्या मध्यभागी बांधण्यात यावी. जेणेकडून अपघात, वाहतूककोंडी किंवा इतर काही अडथळा असो पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागणार नाही. तातडीची मदत वाहनचालकांना मिळू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
२२०१९ मध्ये इंदापूर ते पोलादपूरदरम्यान जवळपास १०० हून अधिक अपघात झाले. यामध्ये ९० अपघात हे महाड आणि इंदापूरदरम्यान झाल्याची नोंद आहे. आशा परस्थितीत महाड येथील महामार्ग वाहतूक पोलीस चौकी ही त्याच ठिकाणी ठेवण्यात यावी, नाहीतर मध्यभागी म्हणजेच दासगाव किंवा वीर गाव हद्दीमध्ये बांधावी; अथवा ५७ किलोमीटर अंतरामध्ये दुसरी चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.