थंड हवेच्या माथेरानला आता धोक्याची घंटा; तापमानवाढ कायम, बाजारपेठेत शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:39 PM2024-04-19T12:39:36+5:302024-04-19T12:41:00+5:30
थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान गेल्या काही दिवसांपासून अधिक तापू लागले आहे.
माथेरान : थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान गेल्या काही दिवसांपासून अधिक तापू लागले आहे. मंगळवारी पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे चिंता व्यक्त हाेत आहे.
एप्रिल, मे महिन्यात राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढत असला तरी माथेरान थंड राहते, अशी ख्याती होती. परंतु आता त्यामध्ये बदल होऊ लागला आहे. मंगळवारी उच्चांकी तापमानाची नोंद केली असून अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने येथील पर्यटनाबाबतच चिंता निर्माण झाली आहे. थंड हवेच्या ठिकाणी तापमान वाढ होत असेल तर येथे येणाऱ्या पर्यटकांचा ओढा आपसूकच कमी होणार आहे.
त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासाठी ही धोक्याची घंटा आहे, असे समजण्यात येते.
वातावरणातील बदलाचा फटका माथेरानच्या पर्यटनाला बसत आहे. येथे थंड हवेसाठी येणाऱ्या पर्यटकांना या बदलाला सामोरे जावे लागत असून त्याचा निश्चितच विपरीत परिणाम येथील व्यवसायावर होणार आहे. दुपारनंतर येथील वातावरणामध्ये कमालीचा बदल घडत असून ढगाळ वातावरणामुळे येथे गर्मी वाढताना दिसते. सायंकाळी मात्र थंड हवा सुटल्याने नागरिकांना दिलासा मिळतो, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी तापमानाचा पारा ३२ अंश सेल्सिअसपर्यंत होता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट होता.