नागोठणे : येथील जुन्या अशा ऐतिहासिक पुलाचे कठडे बुधवारी आलेल्या पुराने ढासळले असून, या कठड्यावरून एका मोबाइल कंपनीची केबल टाकल्यामुळेच हा प्रकार झाला असल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे संपूर्ण पूल ढासळण्यापूर्वी तरी शासनाने यात लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.
येथील अंबा नदीवर असणारा पूल पंधराव्या शतकात निजामशाहीच्या काळात बांधण्यात आला असून, हजारो पुराचे फटके खाऊन तो आजही उभा आहे. मात्र, दूरसंचार खात्याच्या सहकार्यातून दोन-चार वर्षांपूर्वी एका मोबाइल कंपनीची केबल या पुलाच्या कठड्यावरून नेण्याचा प्रयत्न केला असल्याने केबलच्या कंपनामुळे पुलाचा कठडा ढासळत चालला असल्याचे स्पष्ट होत आहे. हा पूल सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असला, तरी ही केबल टाकताना संबंधित विभागाने या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा कार्यभाग साधला गेला असल्याचा आरोप स्थानिक जनतेमधून केला जात आहे. पुरातत्त्व खात्याने या पुलाचे जतन करण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. मात्र, या ऐतिहासिक वास्तूकडे संबंधित खात्याकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याने पूल जमीनदोस्त झाल्यावरच हे पुरातत्त्व खाते लक्ष देणार का, असा संतप्त सवाल स्थानिक जनतेकडून विचारला जात आहे.