पाली शहरातील ऐतिहासिक हटाळेश्वर तलाव दुर्लक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:29 AM2020-01-08T01:29:07+5:302020-01-08T01:29:14+5:30
ऐतिहासिक वारसा असलेल्या पाली शहरातील तलावांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचराभूमीचे स्वरूप प्राप्त आले आहे.
विनोद भोईर
पाली : ऐतिहासिक वारसा असलेल्या पाली शहरातील तलावांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचराभूमीचे स्वरूप प्राप्त आले आहे. हटाळेश्वर तलावांचा परिसर अस्वच्छ झाला आहे. अतिक्रमण, कचरा व सांडपाण्यामुळे तलावांचा श्वास गुदमरत आहे, यामुळे तलाव प्रदूषणमुक्त होणे गरजेचे आहे.
काही वर्षांपूर्वी पाली शहरातील रहिवाशांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून तलावांकडे पाहिले जात असे. मात्र, सध्या या तलावांची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाली शहरात हटाळेश्वर तलावाची तेथील परिसरातील नागरिकांनी अक्षरश: कचराकुंडी केली आहे. ग्रामपंचायतीची कचऱ्याची गाडी घरापर्यंत येत असतानाही तेथील नागरिक कचरा तलावात टाकत आहेत. तर काही नागरिकांनी संडासाच्या पाइपलाइन तलावात सोडल्या आहेत.
याकडे पाली ग्रामपंचायत लक्ष का देत नाही? आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून केला आहे. शहरीकरणामुळे तलावांची संख्या कमी होत असून सध्या अस्तित्वात असलेल्या तलावांची ही पुरती दुरवस्था झाली आहे. यासाठी ग्रामपंचायतीने शहरातील तलावांचे सुशोभीकरण करावे, असे पाली शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच शहरातील प्रत्येक तलावाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. हे तलाव वाचवण्यासाठी पाली शहरातील लोकांनी जनजागृती केली पाहिजे. अनेक तलावांमध्ये कचºयाचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत असून, शहरातील तलावांच्या आजूबाजूच्या रहिवाशांनी कचरा टाकू नये. अनेक वर्षे या तलावाकडे लक्ष दिले नसल्यामुळे तलावांमध्ये दलदल तयार झाली आहे आणि या दलदलीवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे.
तलावाची झाली कचराकुं डी
पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जात असे; त्या तलावाची लोकांनी कचराकुंडी केली आहे.
या तलावांतील गाळ काढला तर त्यातील पाण्याचा उन्हाळ्यात रहिवाशांना वापर करता येऊ शकतो, प्रत्येक तलावाकाठच्या बाजूंनी कचरा दिसत असून त्याच कचºयावर अजून कचरा टाकला जात आहे. अशाप्रकारे कचºयाचे ढीग रचत आहेत.
लवकरात लवकर या तलावांचे सुशोभीकरण करावे, जेणेकरून शरतील नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, गार्डन, बालोद्यान उपलब्ध होईल, अशी मागणी नागरिकांकडून के ली जात आहे.
>पाली शहरात मध्यवती ठिकाणी हटाळेश्वर तलाव आहे. गेली अनेक वर्षे तलावाचे सुशोभीकरण केले नाही, त्यामुळे तलाव घनकचºयाने पूर्णत: भरला आहे.
- वसंत दंत,
व्यापारी