ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांनी फुल्ल, २० हजारांहून अधिक पर्यटकांनी दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:54 AM2018-12-24T04:54:35+5:302018-12-24T04:54:46+5:30
शनिवार व रविवारची सुट्टी साधून हजारो पर्यटकांनी मुरुडमध्ये गर्दी केली होती. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जंजिरा किल्ल्यावर पोहोचत होते.
- संजय करडे
मुरु ड जंजिरा : शनिवार व रविवारची सुट्टी साधून हजारो पर्यटकांनी मुरुडमध्ये गर्दी केली होती. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जंजिरा किल्ल्यावर पोहोचत होते. अचानक पर्यटकांचा लोंढा वाढल्याने वाहतूक यंत्रणेवर ताण पडला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यात आल्याने परिसरात वाहतूककोंडी उद्भवली.
राजपुरी जेट्टी येथे वाहनांची पार्किंग व्यवस्था आहे; परंतु पार्किंगही फुल्ल झाल्याने समुद्रकिनारी मोकळ्या जागेत पर्यटकांनी आपली वाहने उभी केली. खोरा बंदरात तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावण्यात आली
होती.
राजपुरी येथील रस्ते अरुंद आहेत, त्यातच वाहनांची वर्दळ वाढल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघर, औरंगाबाद, नाशिक, धुळे आदी भागातून पर्यटक आले होते. किल्ल्यावर जाण्यासाठी जंजिरा पर्यटक सोसायटीच्या १३ शिडांच्या बोटी, वेलकम सोसायटीची इंजिन बोट तर खोरा बंदरातून सुटणाऱ्या बोटींची व्यवस्था उपलब्ध होती; परंतु पर्यटक मोठ्या संख्येने आल्यामुळे बोट वाहतूक करतानाही अडचणी येत होत्या. राजपुरी जेट्टी येथे बोटीचे तिकीट घेण्यासाठीही मोठ्या रांगा लागल्या होत्या. शिडांच्या बोटींमधून जाणाºया पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश मिळण्यासाठी किमान दीड तासाची वेटिंग करावी लागत होती.
सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी, खोरा बंदर व दिघी येथूनसुद्धा असंख्य पर्यटक आल्याने गर्दी झाली होती. एकाच दिवशी जवळपास २० हजार पर्यटक आल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे निदर्शनास आले आहे.
मुरु ड शहरातील सर्व हॉटेल व लॉजिंग व्यवसाय तेजीत होता. मुरुडप्रमाणे काशीद येथेसुद्धा पर्यटकांची मोठी वर्दळ होती. वीकेण्ड आणि नाताळची सुट्टी असल्याने मुरुड परिसरातील सर्वच बीच पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
जंजिरा किल्ल्यावर सकाळपासूनच गर्दी आहे. जे पर्यटक किल्ल्याच्या आत गेले आहेत, त्यांना पुन्हा बोटीत बसवण्यासाठी वेळ लागत आहे. या दरम्यान वेटिंगवर असलेल्या पर्यटकांना किल्ल्याभोवती राउंड मारून आणत आहोत.
- जावेद कारभारी, चेअरमन, वेलकम सोसायटी