ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:08 AM2020-01-11T00:08:32+5:302020-01-11T00:08:40+5:30

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांना आहे.

Historic Padma Durg Fort | ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची दुरवस्था

ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची दुरवस्था

googlenewsNext

संजय करडे
मुरुड : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांना आहे. गड-किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास, कथा-कादंबऱ्यापेक्षा प्रत्यक्षस्थळ दर्शनाने इत्थंभूत उभा राहतो. ‘ज्याची आरमारावर सत्ता त्याची जगावर सत्ता’ ही धारणा दस्तुरखुद्य छत्रपती शिवरायांची होती. या दृष्टिकोनातून महाराजांनी महाराष्ट्राच्या पाश्चिम किनारपट्टीवर पाच प्रमुख जलदुर्ग उभे केले, त्यामध्ये मुरुडच्या पद्मदुर्गचा समावेश आहे. मात्र, इतिहासाची साक्ष देणाºया या किल्ल्याची दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष होत असून, शिवभक्त, पर्यटक आणि स्थानिक नाराजी व्यक्त करत
आहेत.
ऐतिहासिक दस्तावेजानुसार इ.स. १६७८ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाच्या बांधकामास सुरुवात केली तर बांधकामाची समाप्ती राजे संभाजींनी केली, असा उल्लेख आढळतो. सिद्दीच्या ताब्यात असलेला जंजिरा महाराजांना १४/१५ वर्षे जंग पछाडूनही सर करता आला नाही, म्हणूनच अभेद्द आणि बेलाग अंजिक्य जंजिºयावर करडी नजर ठेवण्यासाठी पद्मदुर्गची निर्मिती अर्थात दंडा राजपुरीच्या उरावर टेहळणी होती. दर्यासारंग दौलतखान या पहाडी छातीच्या आरमार प्रमुखांवर भिस्त होती. असा ऐतिहासिक दृश्यरंजक असलेला किल्ला आज कसाबसा तग धरून आहे. किल्ल्यावर पोहोचल्यावर आपणास किल्ल्याची खरी परिस्थिती समजते. या किल्ल्याच्या भिंती पडल्या आहेत. तसेच गवत व झाडी-झुडपे बेसुमार वाढली आहेत. या किल्ल्यात गोड्या पाण्याचा एक तलाव आहे; परंतु ते आटले आहेत. या तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष के ल्याचे येथील परिस्थितीवरून दिसून येते.
समुद्राच्या जवळ असणाºया किल्ल्याच्या भिंती तुटून पडल्या आहेत; परंतु दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. बहुतांशी भिंतींना चिरा व भेगा पडल्या असून याची वेळेत दुरुस्ती झाली तर या किल्ल्याचे अस्तित्व चिरकालाचे राहणार आहे; परंतु पुरातत्त्व खात्याकडून गेल्या अनेक वर्षांत कोणतेही पैसे खर्च न करण्यात आल्याने किल्ल्याची अवस्था चिंताजनक झाली आहे.
या किल्ल्यात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे येथे तरंगती जेट्टी खूप आवश्यक आहे. कारण मशिनच्या बोटीने पोहोचल्यावर साध्या बोटींमधून या किल्ल्याच्या किनाºयावर पोहोचता येते. जर बोट उपलब्ध न झाल्यास कंबरेपेक्षा वर पाण्यातून किल्ला गाठावा लागतो, यासाठी या किल्ल्यावर तरंगती जेट्टी उपलब्ध झाल्यास किल्ल्यात जाणे-येणे सहज सोपे होऊन पर्यटक व स्थानिक नागरिकांची रेलचेल वाढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे पुरातत्त्व खात्याने दुर्लक्ष केली
आहे.
>किल्ल्याचा इतिहास
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर विजय मिळवता यावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याच्या अगदी समोर कासा (पद्मदुर्ग) किल्ल्याची उभारणी केली. चहूबाजूला समुद्र व समुद्राच्या अगदी मध्यभागी हा किल्ला असल्याने असंख्य पर्यटकांना याचे विशेष आकर्षण आहे; परंतु या किल्ल्याकडे सातत्यपूर्ण वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. जंजिरा किल्ला हा अगदी जवळ आहे, तर पद्मदुर्ग किल्ल्याचे जमिनीपासूनचे अंतर चार किलोमीटरचे असल्याने या किल्ल्यावर पोहोचताच आपण चहूबाजूनी वेढले गेल्याचा भास निर्माण होतो. या किल्ल्यावर जाण्यासाठी मशिनबोट असल्याशिवाय पर्याय नाही. किमान ४० मिनिटांच्या प्रवासानंतर या किल्ल्यावर पोहोचता येते.
>तोफा गेल्या चोरीला
किल्ल्यात जास्त वर्दळ नसल्याने येथील तोफा चोरून नेण्याचा प्रताप समोर आला आहे. दीड वर्षापूर्वी या किल्ल्यात असणारी तोफ चोरून नेण्यात आली होती. याबातची रीतसर तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुरातत्त्व खात्याचा कोणताही व्यक्ती किल्ल्यात हजर नसल्याने या किल्ल्यातील देखभालीकडे पुरातत्त्व खात्याचे मोठे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जंजिरा किल्ल्यावर पुरातत्त्व खात्याने एक विशेष व्यक्ती तैनात केली आहे; परंतु पद्मदुर्ग किल्ल्यात कोणीही व्यक्ती हजर नसते.रायगड किल्ल्यासाठी २० कोटी रुपये शासनाचा निधी मिळतो; परंतु जलदुर्ग किल्ल्यासाठी कोणताही निधी न मिळाल्यामुळे हे किल्ले विकासापासून दूर आहेत. प्राचीन वस्तूचे महात्म्य टिकवणे हे पुरातत्त्व खात्याचे काम असतानासुद्धा ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे किल्ल्यावरील अवस्था पाहून लक्षात येते.
>जंजिरा किल्ल्याप्रमाणे आम्हाला पद्मदुर्ग किल्ला पाहण्यास आवडेल; परंतु येथे जाण्या-येण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. या ठिकाणी तरंगती जेट्टी खूप आवश्यक आहे, जर येथे सुविधा प्राप्त झाली तर आमच्यासारखे पर्यटक या किल्ल्यावरही जाण्यास उत्सुक आहेत.
- प्रणय शृंगारपूर, पर्यटक, नाशिक

Web Title: Historic Padma Durg Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.