खारघरच्या नगरसेवकांचे सिडको कार्यालयावर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:54 PM2020-02-24T22:54:58+5:302020-02-24T22:55:01+5:30
अधिकाऱ्यांना विचारला जाब; कामे होत नसल्याची तक्रार
पनवेल : वारंवार निवेदन देऊनदेखील सिडकोमार्फत कोणतीच कामे होत नसल्याने खारघर शहरातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी शहरातील विभागीय सिडको कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्वासनाशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका घेत सुमारे पाच तास भाजपचे शिष्टमंडळ सिडकोचे अधिकारी संजय पुदाळे यांच्या दालनात बसले होते.
खारघर शहरातील तीन प्रभागांतून भाजपचे सर्वच्या सर्व १२ नगरसेवक निवडून आले आहेत. अशावेळी शहरातील रहिवासी जाब विचारत आहेत. मात्र अद्यापही शहरातील अंतर्गत रस्ते, नाले, गटार, कोपरा पूल आदींसह विविध कामे सिडकोमार्फत योग्य पद्धतीने होत नसल्याने सकाळी १० वाजल्यापासून खारघर शहरातील सिडको कार्यालयातील अधिकारी संजय पुदाळे यांच्या दालनात भाजप शिष्टमंडळाने ठिय्या आंदोलन सुरू केले. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग अ सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे, समीर कदम, दीपक शिंदे,राजेंद्र मांजरेकर, संजय घरत, गुरू म्हात्रे, अजय माळी, महिला नगरसेविका अनिता वासुदेव पाटील, हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, अनिता पाटील, बिना गोगरी, निशा सिंग, गीता चौधरी यांच्या दालनात खाली बसून आम्ही दिलेल्या पत्रांची लेखी उत्तरे मिळत नसून शहरातील प्रलंबित कामे कधी पूर्ण होतील, याबाबत या वेळी सिडको अधिकाऱ्यांना विचारणा केली.
रखडलेल्या कोपरा पुलाबाबत सिडकोचे उदासीन धोरण आहे. नवी मुंबई पालिकेची जलवाहिनी पुलाला अडथळा ठरत आहे. ती हलविण्यासाठी सिडको नवी मुंबई महापालिकेला प्रस्तावदेखील पाठवत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. लेखी आश्वासन दिल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका या वेळी घेण्यात आली. सिडकोमध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे खारघर पोलीस कर्मचाºयांनीही सिडको कार्यालय गाठत घटनेची माहिती घेतली. आगामी काळात नव्याने उर्वरित कामे पूर्ण केली जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेतले.
अध्यक्षपद रिक्त होताच भाजप नगरसेवक आक्रमक
वर्षभरापासून आ. प्रशांत ठाकूर हे सिडकोच्या अध्यक्षपदी विराजमान होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आ. प्रशांत ठाकूर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. ठाकूर यांचे सिडकोचे अध्यक्षपद रिक्त होताच खारघर शहरातील भाजप नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसत आहे.