जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:17 PM2019-07-23T23:17:57+5:302019-07-23T23:18:10+5:30
श्रीवर्धन रुग्णालय कर्मचारी मारहाण प्रकरण : घंटानाद करून व्यवस्थेचे वेधले लक्ष; जिल्ह्यात उमटले पडसाद
अलिबाग : श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अक्षय कांबळे यांना कामावर असताना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. या निषेधार्थ उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धरणे धरून कामबंद आंदोलन केले होते. आरोपींवर कारवाई न झाल्याने श्रीवर्धनमधील सरकारी कर्मचाºयांच्या आंदोलनाला बळ मिळावे यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. त्याचप्रमाणे दुपारी घंटानाद करून व्यवस्थेचे या निषेधार्थ घटनेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सरकारी कर्मचाºयांवर सातत्याने असे हल्ले होत आहेत, त्यामुळे काम करूनही असे अपमानास्पद प्रकार घडत असतील तर ते निषेधार्ह आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी गुन्हेगारांना शासन हे झालेच पाहिजे अशी मागणी राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नागे यांनी केली. असे प्रकार वेळीच रोखले नाही तर ते समाजासाठी घातक ठरणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या सहकाºयांना बळ देण्यासाठी आपली एकजूट असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगून सहकाºयांना बळ मिळावे, यासाठी सरकारी कर्मचारी मस्टरवर सही करून काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याचे स्पष्ट केले.
आरोपींवर कारवाई न झाल्याने मंगळवारी जिल्हाध्यक्ष संदीप नागे, उपाध्यक्ष राकेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन येथे निदर्शने आंदोलन केले. तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे धरून घोषणा देण्यात आल्या.
श्रीवर्धनमध्ये कर्मचाºयांचे तीन दिवसांपासून आंदोलन
शनिवारी रात्री ९ च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील नियोजित कामगिरी बजावणाºया अधिपरिचारक अक्षय अजित कांबळे (२९) यांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली, त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील ३८ कर्मचाºयांनी रविवारपासून दिवसभर कामबंद आंदोलन छेडले आहे. त्याचा परिणाम आरोग्यसेवेवर होत आहे. या प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या १०४७ सभासदांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
श्रीवर्धन पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, श्रीवर्धन नवीपेठेतील समीर सत्यवान थळे याने प्रशांत केतकर यास रक्तदाबाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात आणले. तेव्हा रुग्णालयात नियोजित कामगिरीवरील डॉक्टरांनी प्रशांत केतकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले, त्या प्रसंगी सरकारी रुग्णालयातील नियमानुसार रुग्ण नोंदणी पेपरसाठी दहा रुपये शुल्काची मागणी तक्रारदार यांनी समीर थळे व एका अज्ञात व्यक्तीकडे केली. त्याचा राग मनात धरून सत्यवान थळे, समीर थळे, देवेंद्र भुसाने व एका अज्ञात व्यक्तीने तक्रारदार अक्षय अजित कांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.
तसेच त्याच्या गळ्यातील चांदीची तीन तोळा अंदाजे मूल्य १००० रुपयांची चेन हिसकावून घेतली व त्यांच्या ताब्यातील मोबाइलचे नुकसान केले. रुग्णालयातील कर्मचाºयांच्या तक्रारीनुसार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार समीर सत्यवान थळे, देवेंद्र भुसाने व संतोषतांडेल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी सत्यवान पंढरीनाथ थळे फरार झाला आहे. या मारहाण प्रकरणामुळे रविवारपासून श्रीवर्धन तालुक्यातील सरकारी आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे.