होळी उत्साहात, मात्र धूलिवंदनावर सावट; कोरोनाच्या भीतीने पर्यटनस्थळांवर शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 10:49 PM2020-03-10T22:49:48+5:302020-03-10T22:50:24+5:30

स्थानिकांसह पर्यटकांचा निरुत्साह

Holi excitement, however, clears to dust; Shocked at the sights for fear of Corona | होळी उत्साहात, मात्र धूलिवंदनावर सावट; कोरोनाच्या भीतीने पर्यटनस्थळांवर शुकशुकाट

होळी उत्साहात, मात्र धूलिवंदनावर सावट; कोरोनाच्या भीतीने पर्यटनस्थळांवर शुकशुकाट

Next

अलिबाग : दरवर्षी होळी आणि धूलिवंदनाचा सण जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे दिसून आले. जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव झाला नसला तरी, सावधगिरी म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन केंद्र, राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या पर्यटनस्थळांवर शुकशुकाट दिसत होता.

गेल्या काही दिवसांपासून भारतातमध्ये कोरोनाचे संशयित सापडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये कोरोनाचे दोन संशयित आढळले. त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हूनच काळजी घेत असून अनेकांनी कोरोनाच्या धसक्याने बाहेर पडणे टाळले. तर काही ठिकाणी उत्साही नागरिकांनी आपापल्या पद्धतीने दोन्ही सणांचा मनमुराद आनंद लुटल्याचेही पाहायला मिळाले. सलग सुट्ट्या असल्या तरी सरकारी कर्मचाऱ्यांनी बाहेर न पडता घरात राहूनच सणाचा आनंद लुटला.
शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार अशी चार दिवस सलग सुट्टी होती, मात्र पर्यटकांनी आवडत्या अलिबाग या पर्यटनस्थळाकडेही पाठ फिरवल्याचे दिसून आले.

अलिबाग समुद्रकिनारा स्थानिकांसह पर्यटकांनी दरवर्षी फुलून जायचा. यंदा मात्र त्यामध्ये कमतरता असल्याचे दिसले. पर्यटकांनी हॉटेल, कॉटेज, रेस्टॉरंट भरलेली असयची. मात्र तेथेही तुरळक पर्यटक वगळता शुकशुकाट जाणवत होता. अलिबाग, मुरुडकडे जाण्यासाठी मुंबई, पुण्यातील पर्यटक जास्त संख्येने येत असतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग कायमच व्यस्त असल्याने वाहतूक कोंडी व्हायची. आता मात्र कोंडीमध्ये वाहने अडकून पडल्याचे प्रकार कोठेही घडले नाहीत.

पारंपरिक वाद्याची साथ
गडब येथे उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आला. पारंपरिक वाद्याबरोबर डीजे, लेझर लाईट आधुनिकतेची साथ यावेळी पहायला मिळाली. खारेपाटात विशेषत: सावरीच्या झाडाची होळी जंगलातून आणली. ही होळी आणण्यासाठी गावातील तरुण मंडळी सोबत जेष्ठ मंडळी सुध्दा जंगलात गेली होती. होळी गावात नाचत गाजत गुलाल उधळत गावात आणली गेली.

होळी उत्सवात रंगपंचमीपर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या वेळी कबड्डी, नृत्य स्पर्धा, सोग काढणे असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. होळीचा होम सतत पाच दिवस जळत ठेवण्यात येणार आधुनिक युगातही पारंपरिकता होळीच्या सणात जपली जात आहे. ग्रामीण भागात होळीनिमित्त सोंग काढण्याचे प्रकार अजूनही दिसून येत असून बच्चे कंपनीला त्याचे विशेष आकर्षण असते.

म्हसळ्यात पारंपरिक होळी
म्हसळा : तालुक्यात सुमारे ८० ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला. म्हसळा नगरपंचायत हद्दीतील गौळवाडी, सावर, चिराठी, दुर्गवाडी या गावांमध्ये दुसºयाच दिवशी होळी शांत केली जाते, तर शहरात रंगपंचमीच्या दिवशी होळी शांत केली जाते. सर्वात मानाची होळी खाचरात (होळीचे पटांगण), दुसरी होळी सोनार-कासार समाज यांची, तर पेठकर समाजाची होळी शंकर मंदिर शेजारी लागते. पाच दिवसांच्या कालावधीत सानेवर म्हसळ्याचे ग्रामदेवत धाविर महाराज पालखीत विराजमान होतात.

कोरोनाच्या सावटानंतरही धुळवडीची धूम
उरण : कोरोनाच्या सावटानंतरही उरणमध्ये होलिकोत्सव, धुळवड पारंपरिक पद्धतीने उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. अनेकांनी आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यावर रंगांची उधळण करीत धुळवड साजरी केली. धुळवडीनंतर ठिकठिकाणी समुद्रात पोहोण्याचाही मनसोक्त आनंद लुटला. त्यामुळे मोरा, करंजा, पीरवाडी, माणकेश्वर येथील समुद्रात नागरिकांची गर्दी उसळली होती.

Web Title: Holi excitement, however, clears to dust; Shocked at the sights for fear of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.