होळीसाठी कोळी बांधवांची लगबग
By Admin | Published: March 9, 2017 02:30 AM2017-03-09T02:30:10+5:302017-03-09T02:30:10+5:30
होळी सण हा कोळी समाजाचा आवडता सण असून, या सणाची कोकणातील सर्व कोळी समाज फार आतुरतेने वाट बघत असतो. वर्षभरातून जी मासेमारी होते त्यातील उत्पन्नातून
- संजय करडे, नांदगाव/मुरूड
होळी सण हा कोळी समाजाचा आवडता सण असून, या सणाची कोकणातील सर्व कोळी समाज फार आतुरतेने वाट बघत असतो. वर्षभरातून जी मासेमारी होते त्यातील उत्पन्नातून ही मंडळी हा सण मोठ्या उत्सहात साजरा करतात. होळी सण जवळ आला की, सर्वात प्रथम होड्यांना रंगीबेरंगी पट्ट्यांनी सजवून, त्याला झालर, वेगवेगळ्या रंगांचे झेंडे मोठ्या डौलाने सजवतात. तसेच होडीच्या किनाऱ्यास आकर्षक फुलांची माळ सजवल्याने होड्यांच्या सांैदर्यात अधिक भर पडते. रायगड जिल्ह्यातील असंख्य कोळी बांधव हा सण मोठ्या उत्सहात साजरा करत असतात. खोल समुद्रातून मासेमारी झाल्यावर ही मंडळी मुंबई येथील ससून डॉक (कुलाबा मार्केट) येथे मिळालेली सर्व मासळी विकून खंदेरीच्या वेताळ देवाचे दर्शन घेऊनच घरी परतात. तर यातील काही जण गावाकडून स्वत:च्या बोटीनेसुद्धा वेताळ देवाच्या दर्शनाला येत असतात.
खंदेरीचा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून राजे शिव छत्रपती यांनी १६७९ रोजी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाल्याची नोंद पुरातन दस्तवेजातून मिळत आहे. या किल्ल्यावर दीपगृह, महादेव मंदिर, पाण्याची टाकी, हौद, गणेश व मारु ती मंदिर, पीर, चौथरे आहेत. या किल्ल्यात कोळी समाजाचे श्रद्धास्थान वेताळ देवाचे मंदिरसुद्धा आहे. होळीसाठी काही दिवस घरी परतणाऱ्या मच्छीमारांच्या होड्या श्रद्धेने खंदेरीच्या किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात. या देवाला मानाचा नारळ, पुष्पहार, श्रीफळ, पेढे तसेच मानपानाचा कोंबडा येथे मोठ्या श्रद्धेने अर्पण केला जातो. या वेळी समस्त कोळी बांधव मंदिरामध्ये एकत्र हात जोडून त्यांच्या नौकेचे, जाळीचे, त्यांच्या जीविताचे रक्षण कर. तसेच पुरेसे नौकेला मासे मिळून दे, अशी प्रर्थना वेताळ देवाकडे केली जाते.
याबाबत अधिक माहिती देताना मुरूड कोळीवाड्यातील एकवीरा व कमलावती या होड्यांचे मालक चंद्रकांत बाबू सरपाटील म्हणाले की, ‘होळी हा कोळी समाजाचा आवडता सण असून, दरवर्षी प्रथेप्रमाणे खंदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शन घेण्याची आमची परंपरा आहे.’