कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांचे रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:23 AM2020-09-22T00:23:39+5:302020-09-22T00:23:42+5:30
नवी मुंबईत कचºयाचे ढिगारे : प्रशासनाचे २० दिवसांत प्रलंबित थकबाकी देण्याचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वारंवार निवेदन देऊनही किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळत नसल्यामुळे कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. यामुळे सायंकाळपर्यंत शहरात कचºयाचे ढिगारे पाहावयास मिळत होते. प्रशासनाने २० दिवसांत प्रलंबित थकबाकी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ६,२०० कंत्राटी कामगार काम करत आहेत. कामगार संघटनेच्या पाठपुराव्यानंतर कामगारांसाठी किमान वेतन लागू करण्यात आले. कामगारांना फरकाची रक्कमही देण्यात आली, परंतु कचरा वाहतूक करणाºया कामगारांना किमान वेतन व फरकाची रक्कम मिळाली नव्हती. समाज समता कामगार संघटनेने पाच दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासनाने सर्व लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. ठेकेदाराला तसे आदेशही दिले होते, परंतु ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही दोन महिन्यांत कामगारांना फरकाची रक्कम देण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. ४३ महिन्यांची थकबाकी मिळणे अपेक्षित असताना फक्त १३ महिन्यांची थकबाकी मिळाली होती. उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता, परंतु प्रश्न सुटत नसल्यामुळे २१ सप्टेंबरला एक दिवसाच्या आंदोलनाचा इशारा दिला होता. कचरा वाहतूक कर्मचाºयांनी आंदोलन केल्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात कचºयाचे ढिगारे कायम होते. या आंदोलनाची त्वरित दखल प्रशासनाने घेतली. घनकचरा विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून पुढील २० दिवसांत कामगारांची थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर, आंदोलन मागे घेतले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर, सरचिटणीस मंगेश लाड आदी उपस्थित होते.
सायंकाळी कचरा उचलण्यास सुरुवात
कामगारांनी आंदोलन केल्यामुळे शहरात कचºयाचे ढीग तयार झाले होते. मनपा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले व सायंकाळी तत्काळ कचरा उचलण्यास सुरुवात केली. उशिरापर्यंत काम सुरू होते.
कचरा वाहतूक कर्मचाºयांना त्यांच्या हक्काची थकबाकी मिळावी, यासाठी सनदशीर मार्गाने पाठपुरावा करण्यात येत होता, परंतु प्रश्न सुटत नसल्यामुळे एका दिवसाचे आंदोलन करावे लागले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
- मंगेश लाड, सरचिटणीस,
समाज समता कामगार संघ