हॉलिडे होमचे झाले ‘निवांत वृद्धाश्रम’ डॉक्टर दाम्पत्यांचा आगळा आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 02:31 AM2019-05-05T02:31:36+5:302019-05-05T02:31:50+5:30
अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणापोटी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायात हॉलिडे होमचा व्यवसाय नेहमीच तेजीत असतो, अशा पार्श्वभूमीवर चांगली अर्थप्राप्ती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते.
- जयंत धुळप
अलिबाग - अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणापोटी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायात हॉलिडे होमचा व्यवसाय नेहमीच तेजीत असतो, अशा पार्श्वभूमीवर चांगली अर्थप्राप्ती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र, नागावमधील आपले हॉलिडे होम पुढील दोन वर्षांसाठी वृद्धाश्रमास आणि तेही मोफत देण्याची येथील नाबर दाम्पत्याची सामाजिक बांधीलकी एक आगळा आदर्श ठरली आहे.
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. किरण नाबर हे शिवशांती स्नेहालय सेवेभावी न्यासाच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरे आयोजित करून मोफत रुग्णसेवा करतात. नाबर या न्यासाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी जयश्री नाबर या नागाव गावात निवांत हॉलिडे होम चालवतात. शिवशांती स्नेहालय सेवेभावी न्यासाचा मुख्य हेतू वृद्धाश्रम बांधण्याचा आहे. त्यांच्या हेतूला सामाजिक बांधीलकीतून डॉ. सुभाष म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा म्हात्रे यांनी अर्धा एकर जमीन वृद्धाश्रमाकरिता न्यासाला मोफत देऊन आगळा आदर्श निर्माण केला आहे.
नवीन इमारत उभारणीकरिता सुमारे ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या जागेवर वृद्धाश्रमाची इमारत बांधण्याकरिता सरकारी परवानग्या मिळवून प्रत्यक्ष इमारत उभी राहाण्याकरिता किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
नव्या इमारतीकरिता दोन वर्षे थांबण्यापेक्षा वृद्धाश्रम सुरू करून दोन वर्षांसाठी न्यासाला ते विनाशुल्क दिले आहे. महाराष्ट्र दिनी ‘निवांत हॉलिडे होम’चे रूपांतर ‘निवांत वृद्धाश्रमात’ होऊन प्रत्यक्षात ते कार्यान्वित झाले आहे.