शाळांना सुट्टी मात्र खासगी क्लासेस सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:32 AM2019-08-07T01:32:52+5:302019-08-07T01:32:55+5:30
मुलांच्या सुरक्षेचे काय?; संबंधितांवर कारवाईची मागणी
- सिकंदर अनवारे
दासगाव : गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पुराचे पाणी शिरल्याने मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र, खासगी क्लासेसकडून क्लासेस सुरूच ठेवले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. क्लासेस सुरू ठेवल्याने अनेक मुलांना ग्रामीण भागातून पुराच्या पाण्यातून वाट काढत यावे लागले आहे. शासकीय आदेश न पाळणाऱ्या या खासगी क्लासेसवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असून, महाड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील एस.टी. सेवा आणि खासगी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. महाड आणि परिसरात सातत्याने पाणी रस्त्यांवर येत आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या इशाºयामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. तालुक्यातील बहुतांश शाळा या ग्रामीण भागात आणि नदी, नाले आणि ओठ्याकाठी आहेत. तर शहरातही पूरस्थिती असल्याने शाळा, महाविद्यालये, बंद ठेवण्यात आल्या. शहरात पुराचे पाणी असल्याने कोणताच धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असला तरी खासगी क्लासेसने मात्र याकडे दुर्लक्ष करून क्लासेस सुरूच ठेवले आहेत.
महाड शहरात अनेक खासगी क्लासेस आहेत. यामध्ये शेकडो मुले शिक्षण घेत आहेत. क्लास असल्याने विद्यार्थीही क्लासला येण्यासाठी कोसळणाºया पावसाचा विचार न करता क्लासमध्ये दाखल होत आहेत. महाडमध्ये आजूबाजूच्या गावातूनही खासगी क्लासमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दादली पूल, गांधारी पूल, महाड दस्तुरी नाका, बिरवाडी आदी भागात गेले पाच दिवस पुराचे पाणी कायम आहे. क्लासमध्ये विद्यार्थी दाखल झाल्यानंतर पाणी पातळीत वाढ झाल्यास घरी सुरक्षितपणे जाणे कठीण होणार आहे. याचा विचार मात्र खासगी क्लासेस चालकांनी न करता क्लासेस सुरूच ठेवले. यामुळे पालकांनी आश्चर्य व्यक्त के लेआहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी क्लासचालकांची उठाठेव सुरू आहे.
याबाबत माहिती प्राप्त झाल्यास चौकशी करून तत्काळ करवाई केली जाईल.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अलिबाग