पनवेल : आकुर्ली येथे गृहप्रकल्प न उभारता, बांधकाम व्यावसायिकाने ३२ जणांची तब्बल १ कोटी १५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.
मुंबईतील कांजुरमार्ग येथील पांडुरंग लक्ष्मण घाडगे यांनी व इतर ३२ जणांनी ब्रिजकिंग कन्सको प्रा. लि. चे भागीदार ब्रिजेश नायर यांच्या ब्रिजकिंग प्याराडीसो या आकुर्ली येथील गृहप्रकल्पामध्ये २०१५ मध्ये बुकिंग केले होते. यावेळी गृहप्रकल्पाकरिता शेतकऱ्यांकडून जागा खरेदी केली असून तेथे चार-पाच बिल्डिंग बांधणार आहोत. १८ महिन्यांमध्ये फ्लॅटचा ताबा मिळेल, असे बांधकाम व्यावसायिकाने सांगितले होते. मात्र २०१६ मध्ये देखील इमारतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याबाबत घाडगे यांनी नायर यांच्याकडे विचारणा केली असता, जागामालक शेतकऱ्यांशी बोलणी सुरू असून लवकरच वाद मिटेल, त्यानंतर बांधकाम सुरू करू, असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही बांधकाम सुरू न झाल्याने घाडगे यांनी पैसे परत मागितले. यावेळी नायरने दिलेले तीन वेगवेगळ्या तारखांचे धनादेश बाऊन्स झाले. काही दिवसांनी नायरने नवीन पनवेल येथील कार्यालय बंद करून ऐरोली येथे कार्यालय सुरू केले. घाडगे यांनी ऐरोलीतील कार्यालय गाठून पैशाची मागणी केली. यावेळीही त्याने टाळाटाळ करीत कार्यालय बंद केले, तसेच गुंतवणूकदारांचे फोनही घेणे बंद केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.