आबर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे सरकारी जागेत घर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:05 PM2019-12-15T23:05:43+5:302019-12-15T23:05:56+5:30
पद रद्द करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज
माणगाव : तालुक्यातील आबर्ले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमाने सरपंच रोहिणी रामदास उभारे यांनी संरक्षक वने या सरकारी जागेत अनधिकृत घर बांधले असून आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्या प्रकरणी आबर्ले ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा अनिता महाबळे यांनी विद्यमान सरपंच रोहिणी उभारे यांचे सरपंचपद रद्द करण्याचा तक्रार अर्ज दाखल केला होता. या चौकशीसाठी १३ डिसेंबर रोजी सरपंच गैरहजर राहिल्या.
माजी सरपंच महाबळे यांनी विद्यमान सरपंचांनी बांधलेल्या अनधिकृत घराबाबतचा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला असता, १२ डिसेंबर रोजी माणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड व ग्रामसेवक संजय म्हात्रे आबर्ले ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले आसता, सरपंच रोहिणी उभारे उपस्थित राहिल्या नाहीत. यावर महाबळे यांनी अधिकाºयांकडून माहिती घेतली असता सरपंच वैयक्तिक कामानिमित्त अनुपस्थित राहिल्या असल्याचे सांगितले.
या घराची घरपट्टी लावण्याकरिता अर्ज आला असता झालेल्या बैठकीच्या ठरावामध्ये हे घर अनधिकृत असल्याचे स्पष्ट लिहिले असून, त्यास ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून घरपट्टी आकारावी असे लिहिले आहे. तरी या कामाची माझ्या तक्रार अर्जानुसार जिल्हाधिकाºयांनी चौकशी लावली आहे. त्याची गटविकास अधिकाºयांनी चौकशी करून सरपंच रोहिणी उभारे यांचे सरपंचपद रद्द करून मला न्याय द्यावा, अशी मागणी महाबळे यांनी केली आहे.
सरपंच रोहिणी उभारे यांनी सरकारी जागेत घर बांधले, त्यानुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियमन (१९६० चा मुंबई अधिनियमन ३) चे कलम १४ व १४(३) नुसार तक्रार अर्ज महाबळे यांनी केला असता, चौकशीसाठी विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड व मी, आबर्ले ग्रामपंचायत कार्यालयात गेलो होतो; परंतु सरपंच वैयक्तिक कामानिमित्त गैरहजर राहिल्याचे व तसा त्यांनी अर्ज आमच्याकडे दिल्याचे सांगितले.
- संजय म्हात्रे, ग्रामसेवक,
आबर्ले ग्रुप ग्रामपंचायत
आम्ही दोन वेळा मोजणी केली त्यात एकदा अनधिकृत, एकदा अधिकृत निघते. आता पुन्हा एकदा मोजणी करेपर्यंत अनधिकृत आहे की अधिकृत, काहीच सांगता येणार नाही.
- रोहिणी उभारे, सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, आबर्ले