म्हसळा : तालुक्यातील पाभरे येथे घरफोडी झाली असून, अंदाजे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास के ला आहे. या चोरी प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाभरी येथील रहिवासी खलील इब्राहिम घराडे यांच्या घरी २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारत, घराच्या कपाटातील ३५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे १४ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या घरफोडीबाबत शकिला घराडे यांच्या फिर्यादीवरून चोराविरोधात म्हसळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खेडकर, पोलीस हवालदार चव्हाण, मोरे व जाधव हे करत आहेत.
म्हसळा तालुक्यात लहान-मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. काही महिन्यापूर्वी शहरात एकाच रात्री चार घरफोडी झाल्या होत्या, अजून त्या चोरीचा छडा लागलेला नाही आणि बुधवारी पाभरे येथील झालेल्या १४ लाखांच्या चोरीचा शोध म्हणजे म्हसळा पोलिसांना आव्हानच आहे.पाभरे येथे झालेल्या चोरीचा छडा आम्ही लवकरच लावू; परंतु सर्व नागरिकांनी आपल्या घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित लॉकर्समध्ये ठेवा.- बापूसाहेब पवार, विभागीय पोलीस अधिकारी