कर्जत/ माथेरान : आपल्या कलागुणांचा सुयोग्य पद्धतीने वापर करून चित्रकारितेतील अद्भुत कला सातासमुद्रापार नेण्यासाठी अपार कष्ट केल्यामुळे कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे या मराठमोळ्या चित्रकाराने रायगड जिल्ह्याचे नाव जगप्रसिद्ध केले आहे. मराठमोळ्या चित्रकारितेचा अमेरिकेत सन्मान होणार असून न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ४७ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी पराग बोरसे यांच्या चित्राची निवड झाली आहे. सलग दुसºया वर्षी या प्रदर्शनासाठी निवड होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत.पराग बोरसे यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कलाकृती महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे वास्तववादी दर्शन पाश्चिमात्य देशांना घडवत आहेत. जगामध्ये प्रसिद्ध असणाºया पेस्टल सोसायटी आॅफ अमेरिका या संस्थेचे हे ४७ वे चित्रप्रदर्शन आहे. जगातील अनेक देशांमधील चित्रांची निवड या प्रदर्शनामध्ये आजवर झाली आहे, परंतु भारतातून निवड होणारे पराग बोरसे हे एकमेव भारतीय ठरले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्याच वर्षी पेस्टल सोसायटी आॅफ वेस्ट कोस्ट म्हणजेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित या कलासंस्थेने पराग बोरसे यांच्या चित्राला त्यांचा सर्वोत्तम समजला जाणारा (साऊथ वेस्ट आर्ट मॅगझिन) पुरस्कार देऊन सन्मानितही केले होते. यावर्षीचे हे चित्र प्रदर्शन ३ ते २८ सप्टेंबर २०१९ या काळामध्ये न्यूयॉर्क येथे होणार आहे.
मराठमोळ्या चित्रकारितेचा अमेरिकेत सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:57 PM