पेण : इकोफ्रेंडली होळीचा सण साजरे करणाऱ्या सात मंडळांचा वृक्ष वल्ली आम्हा सोयरे,वनचरे या संकल्पनेनुसार स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन पेण नगर परिषदेकडून सत्कार करण्यात आला.
पर्यावरणाचे जतन व संवर्धन ही आज काळाची गरज आहे. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल आणि बिघडलेल्या निसर्गचक्रामुळे वर्षभरात अनेक ठिकाणी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस,त्सुनामी, बर्फ वृष्टी, गारपीट, भूकंप, यासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. एक सुजाण नागरिक म्हणून होळी सण साजरा करण्यासाठी जिवंत वृक्षांची तोड न करता इकोफ्रेंडली पर्यावरण पूरक होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले.
इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करण्यासाठी पेण नगर परिषदेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकी प्रसंगी आपले विचार मांडताना नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी वनांचे जतन संवर्धन करा असे सांगतना मानव जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत झाडे पाणवायू देतात, उत्सर्जित कार्बन डायऑक्साइड शोषण करतात. ही मोफत मिळणारी सेवा आणि शुद्ध हवेची मात्रा झाडापासून आपणाला मिळते, त्या वृक्षाचे महत्व संतांनी अधोरेखित करत त्यांना आपले सगेसोयरे म्हणून गौरविण्यात आले आहे. त्या वृक्षांची होळी सण साजरा करण्यासाठी कत्तल न करण्याची प्रतिज्ञा, निश्चय या सणाच्या पार्श्वभूमीवर करु या असे त्यांनी सांगितले. पेण नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण पूरक होळीचा सण साजरा करण्यासाठी व शहरातील नागरिकांनी पर्यावरण पूरक होळी उभारण्यात पुढाकार घ्यावा यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी गटनेते अनिरुद्ध पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, महिला बालकल्याण सभापती ॲड. तेजस्विनी नेने, डॉ.अशोक भोईर, वृक्षमित्र प्रा. उदय मानकवळे सर, नगरसेवक अजय क्षीरसागर, माजी नगरसेवक प्रकाश रमाणे, आरोग्य विभागातील अधिकारी अंकिता इसाळ, प्रभाकर गायकवाड, यासह पर्यावरण पूरक होळीचा सण साजरा करणारे पेण शहरातील सात मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य विभागातील अधिकारी अंकिता इसाळ व प्रभाकर गायकवाड यांनी केले.
या मंडळांचा सन्मानयाप्रसंगी सुकी लाकडे, पालापाचोळा, शेणाच्या गोवऱ्या, यापासून पर्यावरण पूरक होळी उभारुन सण साजरा करणारे शहरांत सात मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सन्मान नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये श्री. दत्त क्लब मित्र मंडळ, जय अंबे मित्र मंडळ, मुक्ताई नगर रहिवासी संघ, साखर चौथ गणेशोत्सव मंडळ गोळीबार मैदान, प्रभाकर नगर मित्र मंडळ, महेश्वरी अपार्टमेंट मित्रमंडळ,श्री धनंजय पाठारे मित्र मंडळ तरेआळी या पेण शहरातील मंडळांनी गेले चार वर्षे इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करण्यावर भर देऊन प्रबोधन केल्याने त्यांचा पेण नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण संवर्धन मित्र म्हणून गौरविण्यात आले.