रायगड : अलिबाग शहरालगत असलेल्या वरसाेली गावामध्ये मधमाश्यांच्या हल्ल्यात दाेन जण जखमी झाले, तर एका घाेड्याला आपला प्राण गमवावा लागला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. जखमींवर उपचार करून त्यांना साेडण्यात आले आहे.
वरसाेली समुद्रकिनारी पर्यटकांच्या मनाेरंजनासाठी घाेडेस्वारीची साेय करण्यात आलेली आहे. वरसाेली येथील स्थानिक असलेले याेगेश वसरसाेलकर यांचाही हाच व्यवसाय आहे. त्यांच्या तबेल्यामध्ये सुमारे आठ घाेडे आहेत. त्यांच्या शेजारीच एक भले माेठे झाड आहे. त्या झाडावर मधमाश्यांचे माेठे पाेळे आहे. दुपारच्या सुमारास या झाडाभाेवती एक घार घिरट्या घालत हाेती. त्यानंतर तिने त्या पाेळ्यावर चाेच मारल्याने मधमाश्या सैरावैरा उडू लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाेळ्यातील काही मधमाश्यांनी शेजारीच असलेल्या अलिबागकर यांच्या तबेल्यातील घाेड्यांवर हल्ला चढवला. घाेडे माेठ्याने विव्हळत हाेते. त्यामुळे त्या ठिकाणी याेगेश पाेहोचले असता घाेड्यांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याचे दिसून आले. त्यांनी मधमाश्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मधमाश्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या वाडीतील अन्य एकालाही मधमाश्यांनी जखमी केले. मधमाश्या एका घाेड्यावर तुटून पडल्याने घाेडा गंभीर जखमी झाला. डाॅक्टरांना तातडीने पाचारण करण्यात आले. परंतु घाेड्यावर उपचार सुरू असतानाच घाेड्याचा अंत झाला. याेगेश यांच्यासह अन्य एका जखमीवर उपचार करून त्यांना साेडण्यात आले. घाेड्याच्या मृत्यूने आर्थिक नुकसान तर झालेच आहे असे याेगेश यांनी सांगितले.