वावोशी : घोडवली ते पळसदरी मार्गावर संरक्षक कठडे गायब झालेला पूल रहदारीसाठी धोकादायक झाला असून प्रवासी जीव मुठीत घेवून प्रवास करत आहेत.
खालापूर हद्दीत घोडवलीमार्गे कर्जत पळसदरी मार्गाला जोड रस्ता आहे. केळवली रेल्वे स्थानक तसेच कर्जतला जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने कामगार, विद्यार्थी, व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात या मार्गावरून वर्दळ असते. पुलाखालून वाहणारा नाला पावसात तुडुंब भरून वाहत असून आधीच जुना पूल तो ही संरक्षक कठड्याविना त्यामुळे पुलावरून जाताना भीती वाटते असे घोडवलीचे रहिवाशी कृष्णा शिंदे यांनी सांगितले. रात्रीच्या वेळेस तर अपघाताची दाट शक्यता असून या अगोदर पुलावर अपघात झाले आहेत.पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला होता. महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देवून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी होत आहे.
पुलाची दुरुस्ती आणि संरक्षक कठड्याचे काम होणे गरजेचे आहे. पूल जुना असल्यामुळे नवीन पूल बांधणे गरजेचे आहे. - अक्षय पिंगळे,पंचायत समिती सदस्य, खालापूर