मर्कटलीलांनी बागायतदार हवालदिल, फळांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:07 AM2019-11-07T01:07:11+5:302019-11-07T01:07:26+5:30
फळांचे नुकसान : वनविभागाने कारवाई करण्याची मागणी
अभय आपटे
रेवदंडा : अलिबाग तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या निसर्गरम्य आक्षी, नागांव, चौल आणि रेवदंडा गावातील बागांमध्ये माकडांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. ही माकडे काही फळे खातात तर त्यापेक्षा अधिक फेकून देतात. त्यामुळे या मर्क टलीलांनी बागायतदार हवालदिल झाले आहेत. यामुळे वनविभागाने योग्य करवाई करून बंदोबस्त करावा, अशी मागणी के ली जात आहे.
नारळ-सुपारीच्या बागा हे नागाव-रेवदंडा परिसराचे वैशिष्ट्य आहे. मुरुड-अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांना या बाजा भुरळ घालतात. त्यामुळेच येथील धार्मिक स्थळे पाहिल्यानंतर पर्यटक काही वेळ बागांच्या सानिध्यात विसावतात. आंबा, फणस, चिकू, पेरू, अननस, पपनीस, केळी, रामफळ, पपई आदी फळांची झाडेही येथे आहेत. चाफा, गुलाब, मोगरा, आबोली ही फुलेही बहरतात, तर वाल, पावटा, कडधान्ये पिकवली जातात. गेली अनेक वर्षे बागा व शेतीला नैसर्गिक आपत्तीची दृष्ट लागली असताना. कोळे रोगामुळे सुपारी गळून नुकसान होत आहे. चार वर्षांपासून इरीफाइड रोगाचा नारळाला प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे या फळाला आकार कमी होत असल्याने उत्पन्नात घट होत आहे. काही वर्षांपासून बागायतीला आणि शेतीला माकडांच्या उच्छादामुळे फटका बसला आहे. माकडांच्या टोळ्या फळझाडे झोडपून काढतात. अशा विविध कारणाने शेतकरी सतत अडचणीत येत आहे. चौल-रेवदंडा परिसरात माकडांचा उच्छाद पाहता बागांचे होणारे नुकसान पाहता त्यांना वनीकरण विभागाने पकडून भीमाशंकर, फणसाड व कर्नाळा अशा जवळच्या अभयारण्यात सोडण्यात यावे, अशी मागणी चौल चौकी परिसरातील बागायतदार विश्वास जोशी यांनी केली आहे.
बाजारपेठांमध्येही मुक्तसंचार
बागायतदारांचे, शेतीचे नुकसान करणारी माकडे आता मानवी वस्तीत घुसून बाजारपेठेतील एका घरावरून दुसºया घरावर उड्या मारतात. वेळ पडली तर वीज वितरण कंपनीच्या वीजवाहिनींचा आधार घेतात, त्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. काही प्रसंगी एका घरावरून दुसºया घरावर उडी मारताना रस्त्यावर पडून अपघातही घडत आहेत. दूरध्वनी वाहिन्यांवरून उड्या मारत असल्याने दूरध्वनी बंद पाडतात. घरांवरील पत्रे, कौले यांच्या नुकसानीची गणतीच नाही, यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत.