वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : रुग्णालयात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमध्ये आजाराशी दोन हात करणाऱ्या निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. भंडारा घटनेनंतर नुकत्याच नाशिक, भांडूप व विरार येथील घटना खरोखरच अत्यंत दुःखदायक आहेत. या घटना प्रशासनाला टाळता येऊ शकतात का? तर हो. नक्कीच, या घटना प्रशासनाला टाळता येऊ शकतात. अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये चौकशीनंतर धक्कादायक बाबी पुढे येत असतात. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक रुग्णालयांनी रुग्णालयाचा फायर ऑडिट केलेला नाही.
पनवेल महानगरपालिका हद्दीत देखील शेकडो रुग्णालये व नर्सिंग होम आहेत. मात्र, बहुतांश रुग्णालयांनी आपल्या आस्थापनेचे फायर ऑडिट केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात तब्बल २२२ रुग्णालये व नर्सिंग होम्स आहेत. यामध्ये ३८ रुग्णालये कोविड रुग्णालये आहेत. यापैकी केवळ १५ ते २० रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाचे फायर ऑडिट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बहुतांशी रुग्णालयांनी याबाबत टाळाटाळ केल्याचे दिसून येत असून राज्यातील इतर भागात घडलेल्या आगीच्या घटना पनवेलमध्ये घडल्यास प्रशासनाला हतबल होण्याशिवाय दुसरे काहीच पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. कोविडच्या साथीत रुग्णालयाने पूर्णपणे भरली आहेत. नॉन कोविड रुग्णालयात देखील इतर व्याधी जडलेले रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर याठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांचे काय? या रुग्णालयांत कोणत्याही प्रकारचे ‘लाइफ सेव्हिंग बॅकअप’देखील नाही. अगदी अडचणीच्या जागी यातील अनेक नर्सिंग होम थाटण्यात आले आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास रुग्ण किंवा नातेवाइकांना बाहेर काढण्यास किंवा पळून जाण्यास देखील सुरक्षित मार्ग नसल्याने याबाबत रुग्णालय प्रशासनाने राज्यातील रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पालिका प्रशासन वारंवार सांगून देखील याचे गांभीर्य रुग्णालय प्रशासनाला कळणार नसेल तर पालिकेने अशा रुग्णालयांवर कारवाई करणे गरजेचे आहे. पालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घ्यावे यासंदर्भात रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. पालिका क्षेत्रातील १५ ते २० रुग्णालयांनी फायर ऑडिट केलेले असल्याची माहिती पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी दिली आहे.
रुग्णालयात आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पालिका प्रशासनाने सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याबाबत पनवेल महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र लिहिले आहे. याबाबत पालिका प्रशासनाने एजन्सी नियुक्त करून रुग्णलयातील अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेऊन संबंधित रुग्णालयात मॉक ड्रिल करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरजरुग्णालयात आग लागण्याच्या घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणा कार्यन्वित करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणार्थी कर्मचारी वर्गदेखील रुग्णालयात कार्यान्वित असणे गरजेचे आहे. बहुतांश वेळेला रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असते. मात्र, ती यंत्रणा हाताळण्याची कोणतीच माहिती या कर्मचाऱ्यांना नसते.राज्यातील सर्वच पालिका प्रशासनाकडे रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा तपासण्यासाठी स्वतंत्र असे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने शासनाने फायर ऑडिटकरिता काही एजन्सीने मान्यता दिली आहे. शासनाच्या मान्यताप्राप्त एजन्सीकडून रुग्णालयांनी रुग्णालयाचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. त्यांनतर ऑडिटचा रिपोर्ट अ फॉर्म पालिकेच्या अग्निशमन विभागात सबमिट केला जातो. त्यांनतर पालिका प्रशासन संबंधित रुग्णालयांना ना हरकत परवाना (एनओसी) देत असते. यानंतर प्रत्येकी सहा महिन्यांत रुग्णालयांनी ऑडिट केलेल्या एजन्सीद्वारे बी फॉर्म पालिकेत सबमिट करणे क्रमप्राप्त असते.