- गणेश प्रभाळे
दिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हॉटेल्स खुली झाली, पण पर्यटक अद्याप न फिरकल्याने हॉटेल व्यावसायिकांचा थोडा अपेक्षाभंगच झालेला आहे. सरकार पर्यटन सुरू करू पाहत असले, तरी जोपर्यंत पर्यटक येणार नाहीत, तोपर्यंत हॉटेल्स खुली करूनही अर्थ नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.१ नोव्हेंबरपासून दिवेआगारमधील पर्यटन सुरू झाले आहे. येत्या काळात किती पर्यटक येतील आणि विस्कळीत झालेली आर्थिक घडी बनवण्याचे आव्हान हॉटेल व्यावसायिकांसमोर आहे. सध्या दिवेआगरमध्येच महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ परवाना अंतर्गत निवास आणि न्याहारीचे १५० हून अधिक हॉटेल व घरगुती साधारण १५० व या व्यतिरिक्त २५ प्रमुख खानावळी आहेत. कोरोनात पर्यटकांची हॉटेल रूम्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जाते. सर्वासाठी मास्क, सॅनिटायझर यांचा वापर नित्यानेच केला जातो. अनेक कामगार आपल्या मूळगावी गेलेले आहेत, ते परतण्यासही थोडा वेळ लागेल. दिवाळीमध्ये जर पर्यटक आले, तर हॉटेलमधील रेस्टॉरंट्सही सुरू करता येतील. कोरोनातून सावरणाऱ्या कोकणासाठी नव्याने पर्यटन धोरण ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. या काळात मार्केटिंग, कौशल्य व्यवस्थापन, व्यावसायिक प्रशिक्षण यांवर भर द्यावा लागणार आहे.
पर्यटकांची दिवेआगर येथे भेट देण्यास सुरुवात होत आहे. आता झालेल्या वीकेंडला तेवढी गर्दी झाली नाही.- स्वप्निल पाते, हॉटेल व्यावसायिक, दिवेआगर
आठ महिन्यांनंतर आम्ही व्यवसाय सुरू केला आहे. संकट दूर करण्यासाठी येथे शासन सुविधा मिळाव्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.- रामदास वाघे, व्यावसायिक, दिवेआगर
दिवेआगर येथे सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळी सुट्टीत सहकुटुंब येथे येण्याचा बेत आखला आहे.- मुकुंद म्हसवडे, पर्यटक, पुणे
पर्यटन सुरू होऊन चार - पाच दिवस झाले आहेत. गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळी हाऊसफुल्ल होईल. अशी आशा आहे.- देवेंद्र नार्वेकर, हॉटेल व्यवसायिक
सध्या येथे ५० ते ६० टक्क्यांनी पर्यटकांची संख्या दिसते आहे. पुढे ही संख्या वाढण्याची खात्री आहे.- प्रीतम भुसाणे, व्यवसायिक, दिवेआगर.