विहीर आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तासभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:25 AM2019-05-26T00:25:48+5:302019-05-26T00:25:53+5:30

आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे.

 An hour-long waterpot is used for drinking water from the well | विहीर आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तासभर पायपीट

विहीर आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तासभर पायपीट

Next

- विजय मांडे 
कर्जत : तालुक्यातील आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने शिवकालीन पेठ किल्ल्यावरील कुंडातून पाणी खाली आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी डिझेल पंप लावून पाणी खाली लोकवस्तीत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कर्जतपासून अंबिवली गाव ४३ किलोमीटर अंतरावर आहे, तर पुढे दोन किमीवर डोंगरात चालत जाऊन पेठ गावात जाता येते. गावालगत मागे शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर उभा असलेला किल्ला आहे. पेठ किल्ल्यावरील विहिरीवरच गावातील रहिवाशांची तहान भागते. मात्र, सध्या ती आटल्याने गावातील महिलांना जामरुख गावाकडे डोंगर उतरून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगराखाली असलेल्या नदीमध्ये ग्रामस्थ डवरे खोदून पाणी भरतात आणि पुन्हा डोंगर चढून गावात पोहोचतात. म्हणजे हंडाभर पाण्यासाठी त्यांना तासभराची पायपीट करावी लागते.
कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी २१ मे रोजी पेठ गावातील पाणीसमस्या जाणून घेतली. या ठिकाणी कोणतेही वाहन जात नसल्याने २ किलोमीटरची पायपीट करीत जामरुख ग्रामपंचायतचे प्रभारी प्रशासक सुनील आयरे यांच्यासह गावातील विहिरीचीही पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत चर्चा करून पेठ किल्ल्यावर असलेल्या शिवकालीन पाण्याच्या कुंडांची पाहणी केली. तीनपैकी दोन कुंडांमध्ये पाणी आहे; पण ते खाली कसे आणायचे? असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामस्थांची मागणी योग्य असल्याने तत्काळ ग्रामपंचायतीला आदेश देऊन किल्ल्यावरील पाणी खाली गावात आणण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यास सूचित करण्यात आले.
>पेठ गावातील पाणीटंचाईची दाहकता लक्षात आली असून, किल्ल्यावरील पाणी खाली आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेठ गावात एक विहीर नव्याने खोदली जात असून त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघू शकेल.
- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी

Web Title:  An hour-long waterpot is used for drinking water from the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.