गणसंख्येअभावी सभा तहकूब
By admin | Published: March 19, 2016 12:47 AM2016-03-19T00:47:23+5:302016-03-19T00:47:23+5:30
खोपोलीचे नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, असा आरोप करीत बहुसंख्य सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार
खोपोली: खोपोलीचे नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, असा आरोप करीत बहुसंख्य सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे, सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर ओढवली.
सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता होती तरीही २०-२५ मिनिटे एकही नगरसेवक सभागृहात हजर नव्हता. ११.३० च्या सुमारास नगराध्यक्ष मसुरकर, मुख्याधिकारी दीपक सावंत व काही नगरसेवक सभागृहात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या माधवी रिठे, अश्विनी पाटील, शिवसेनेच्या प्रिया जाधव, शेकापच्या अनिता शहा, समीना जळगावकर, व राष्ट्रवादीचे स्वीकृत सदस्य रोहिदास पाटील यांचा समावेश होता. सदस्य सभागृहात असल्याने कोरम पूर्ण झाल्याने अध्यक्षांनी सभेला सुरुवात केली. राष्ट्रगीत झाल्यानंतर मागील इतिवृत्ताचा विषय अध्यक्षांनी पुकारला. नगरसेवक रोहिदास पाटील यांनी लौजी गावात आठ दिवस पाणी येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे सर्व सुरू असतानाच अश्विनी पाटील या फोनवर बोलत-बोलत बाहेर गेल्या. दोन मिनिटांनी त्या सभागृहात आल्या आणि त्यानंतर लगेचच त्या व मुमताज पाटील काहीही न सांगता सभागृहाबाहेर निघून गेल्या.
रोहिदास पाटील यांनी लगेच दोन नगरसेविका बाहेर गेल्यामुळे कोरम नसल्याची बाब नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. अध्यक्षांनीही त्यांचा मुद्दा ग्राह््य मानून सभा तहकूब केली. अशाप्रकारे विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षातील नगरसेवकांनीही सभागृहाकडे पाठ फिरवल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर ओढावली. नगराध्यक्षांचे विश्वासू सहकारी मंगेश दळवी व मोहन औसरमल हेही अनुपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. (वार्ताहर)
पाण्याचा मुद्दा
नगरसेवक रोहिदास पाटील यांनी लौजी गावात आठ दिवस पाणी येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र यावर काहही महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकली नाही.
सभागृहात सुरु वातीला गणसंख्या होती, म्हणून कामकाज सुरू केले. मात्र दोन नगरसेविका निघून गेल्याने सभा तहकूब करावी लागली.
- दत्तात्रेय मसुरकर, नगराध्यक्ष
नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर हे शहराच्या विकासाकडे फारसे लक्ष देत नसल्यामुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक नगरसेवक त्रस्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून नाराजी आहेच. आज ही नाराजी संघटित स्वरूपात दिसल्यामुळे सभा बरखास्त करण्याची नामुष्की अध्यक्षांवर ओढावली आहे.
- कुलदीप शेंडे,
माजी उपनगराध्यक्ष
गेली चार वर्षे नगराध्यक्ष मसुरकर यांना शहराच्या विकासासाठी सर्वांनी साथ दिली. परंतु त्यांचा मनमानी कारभार वाढतच आहे. ते नगरसेवकांना विश्वासात न घेता निर्णय घेत आहेत, त्यामुळेच आजचे बहिष्काराचे अस्त्र उगारावे लागले.
- श्रीकांत पुरी, नगरसेवक, शेकाप