रोह्यातील घरफोडीचा उलगडा, मध्यप्रदेशमधून तीन जण जेरबंद; शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
By राजेश भोस्तेकर | Published: August 18, 2023 02:42 PM2023-08-18T14:42:10+5:302023-08-18T14:44:08+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून शंभर टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अलिबाग : मध्यप्रदेशवरून चोरटे रोह्यात आले. रोह्यातील भुवनेश्वर हद्दीतील एक बंद घर हेरले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्या चोरट्यांनी बंद घरावर डल्ला मारून ३१ तोळे सोने आणि अर्धा किलो चांदी असा ९ लाख ३५ हजाराचा ऐवज लंपास करून पलायन केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून शंभर टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत कैलास कमरू डावर (२६), निहाल सिंग गोवन सिंग डावर (४०), सोहबत इंदरसिंग डावर (३६) या तीन आरोपींना अटक केली होती. आरोपींनी रोहा येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सध्या आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
रोहा शहरातील भुवनेश्वर येथे निवृत्त शासकीय अधिकारी असलेले पती पत्नी राहत आहेत. जुलै महिन्यात ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्याचे घर हे बंद होते. २७ जुलै रोजी आरोपी हे पनवेल येथून चोरीच्या उद्देशाने रोहा येथे आले. त्यानंतर तिघा आरोपींनी रोहा शहरात फिरून पाहणी केली. भुवनेश्वर येथे पाहणी करीत असताना निवृत्त अधिकारी यांचे घर बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनात आले. या गोष्टीचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास तीनही चोरट्याने बंगल्यात शिरकाव केला. बंगल्यात असलेली खिडकीची ग्रिल तोडून बंगल्यात प्रवेश केला.
चोरट्यांनी बंगल्यात ठेवलेल्या कपाटातील दोन मंगळसूत्र, दोन हार, पाच कानातील झुमके, १० हातातील बांगड्या आणि पाच अंगड्या असा ३०.५ तोळे सोन्याच्या वस्तू आणि एक चांदीचा अर्धा किलो वजनाचा तांब्या असा ९ लाख ३५ हजाराचा ऐवज घेऊन पसार झाले. फिर्यादी हे घरी आल्यानंतर घरात घरफोडी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रोहा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मुद्यावर तपास करून आरोपी मध्य प्रदेश मधील असल्याचे कळले. स्थानिक गुन्हे पथकाने मध्यप्रदेश येथे जाऊन येथील दुर्गम भागातील गेटा गांव, तांडा येथे तेथील स्थानिक गुन्हे विभागाची मदत घेतली.
मध्यप्रदेश स्थानिक गुन्हे विभागाचे उप निरीक्षक भैरवसिंग देवडा, उपनिरीक्षक रामसिंग गौरे, पोशी आर बलराम, आरक्षक प्रशांत सिंग चौहान याच्या मदतीने रायगड स्थानिक गुन्हे पथकाने आरोपींना अटक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे याच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोह अमोल हंबीर, प्रतीक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत, पोना विशाल आवळे, सचिन वावेकर, सायबर विभागाचे पोना तुषार घरत, पोशी अक्षय पाटील यांनी यशस्वी कारवाई केली आहे.