महाड : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाड तालुक्यातील वाघेरी आदिवासीवाडीवरील एक घर कोसळले. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नसले तरी सात जणांचे कुटुंब मात्र उघड्यावर आले आहे. प्रशासनाने मात्र गेल्या चार दिवसांत याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. सखाराम तुकाराम पवार यांच्या मालकीचे हे घर आहे. चार दिवसांपूर्वी घरातील सर्व जण कामासाठी बाहेर गेले असता, दुपारच्या सुमारास घर कोसळले.
महसूल विभागाने तातडीने या नुकसानीचा पंचनामा करणे गरजेचे होते. मात्र, गेल्या चार दिवसांत तलाठी किंवा महसूल विभागाचा एकही अधिकारी या आदिवासीवाडीवर पोहोचलेला नाही. त्यामुळे हे कुटुंब तातडीच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पोलादपूर, महाडमधील डोंगराळ भागातील घरांचे, गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पैकी काही घरांचे पंचनामे करण्यात आले असले तरी अद्याप अनेकांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. वाघेरेतील आदिवासीवाडीतील घराचे नुकसान झाल्याने कुटुंब उघड्यावर आले असून, भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.