अलिबाग : नाताळ सणाच्या अनुषंगाने आलेल्या विकेंडमुळे लाखो पर्यटक हे अलिबागमध्ये दाखल झाले होते. सोमवारी पर्यटक हे परतीच्या मार्गावर निघाले असून त्यांना वाहतूक कोंडीसह गर्दीचा सामना करावा लागला. मांडवा येथून जलवाहतूकिने मुंबई गेटवेला जाण्यासाठी तीनही जलवाहतूक बोटींना तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे मांडवा बंदरात पर्यटक प्रवाशांच्या बोट पकडण्यासाठी रांगा पाहायला मिळत होत्या. रविवारी दिवसभरात शंभर फेऱ्या झाल्या असल्याची माहिती मेरीटाईम विभागातर्फे देण्यात आली.
शनिवार ते सोमवार असे तीन दिवसांचा मोठा विकेंड आला होता. त्यामुळे शुक्रवार सायंकाळ पासूनच अलिबाग कडे पर्यटकांची पावले वळली होती. मुंबईतून जलवाहतूकीने येण्यासाठी गेटवेला मोठ्या रांगा लागल्या होत्या. अलिबागकडे येताना जशी गर्दी होती तशीच परतीच्या प्रवासात मांडवा बंदरात परिस्थिती पाहायला मिळाली. दुपारनंतर मांडवा बंदरात बोट पकडण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
मांडवा ते गेटवे अशी जलवाहतूक सुविधा असल्याने पर्यटक या प्रवासाला अधिक पसंती देत असतात. पीएनपी, मालदार आणि अजंठा या जलवाहतूक व्यवसायिक बोटी आहेत. रविवारी अजंठा मार्फत ७१ फेऱ्या प्रवाशांना घेऊन बोटीने मारल्या तर पी एन पी, मालदार मार्फत वीस फेऱ्या झाल्या. रविवारी दिवसभरात शंभर हुन अधिक जलवाहतूक बोटीने हजारो प्रवाशांना गेटवे येथे सुखरूप सोडले. मांडवा बंदर हे प्रवाशांनी हाऊस फुल्ल झाले होते. ज्यांनी आगाऊ बुकिंग केले होते त्यांचा प्रवास हा खडतर झाला असला तरी सुखरूप मुंबईत पोहचले. मात्र तिकीट न मिळालेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले होते.
एसटी बसही हाऊसफुल्लज्यांना जलवाहतूकीचे तिकीट मिळाले नाही त्यांनी एस टी बसचा आधार घेतला होता. त्यामुळे बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. एस टी विभागाकडून जादा बसेसची सुविधा केली होती. मात्र वाहतूक कोंडीमुळे एस टी चे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे अलिबाग आगारातून उपलब्ध असलेल्या बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे काहीसा दिलासा प्रवाशांना मिळाला.