प्रकाश कदम
पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरण कामाने वेग घेतला असून सद्यस्थितीत पोलादपूर शहरातही काम वेगाने सुरू आहे. मात्र या कामामुळे पोलादपूर शहरातील महामार्गालगतच्या घरांना हादरे बसून बहुसंख्य घरांना तडे गेल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
पोलादपूर शहरात महामार्गाच्या भूमिगत मार्गाचे काम सुरू असल्यामुळे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या कमानीपासून ते सडवली फाटा पर्यंत भूमिगत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे ३० फूट खोल खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे महामार्गालगतच्या घरांना प्रचंड प्रमाणात हादरे बसत आहेत. त्यामुळे घरांना तडे जाऊन नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण? असा प्रश्न महामार्गालगत राहणारे नागरिक विचारत आहेत. मात्र संबंधित ठेकेदार कंपनी आणि नॅशनल हायवेचे अधिकारी वर्ग कानावर हात ठेवून आहेत असा आरोप नागरिकांतून केला जात आहे. याबाबत येथील समाजसेवक राजेश धुमाळ म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग ६६ हा शहरातून जाणारा रस्ता क्रॉस आहे तो सरळ जायला पाहिजे होता परंतु ज्या बाजूने वस्ती आहे त्या बाजूला जादा भूसंपादन करण्यात आले आहे. तसेच डिमार्केशन वस्तीच्या बाजूने झाल्यामुळे रस्ता घरांच्या जवळून जात आहे हेच जर दोन्ही बाजूने समांतर घेतले असते तर हा धोका काही अंशी टाळता आला असता. सद्यस्थितीत ओव्हर पास कामामुळे जवळ जवळ ३० ते ३२ फूट खोल खोदाई करून रस्त्याचा मेन ट्रॅक आहे तो नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ओव्हर पास स्लॅबचा भाग सोडता अन्य ठिकाणी जो खड्डा तयार झाला आहे त्याला कुठेही संरक्षण भिंतीचे बांधकाम न करता फक्त जाळी टाकून ते काम मजबूत आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता येथील संपूर्ण भुसभुशीत माती असल्यामुळे हे खोदकाम करताना आजूबाजूच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.
कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे येथील पावसाच्या पाण्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
महामार्गाच्या कामामुळे प्रचंड प्रमाणात हादरे बसून घराला तडे जाऊन घरात रात्री झोपणेही अवघड झाले आहे. याबाबत तहसीलदार यांना सांगून लेखी तक्रार अर्ज देऊनही काही कार्यवाही होत नाही. शासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का ?- निरंजन मोरे, ग्रामस्थ, पोलादपूर