पनवेल स्थानक परिसरातील झोपड्यांचे होणार पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:21 AM2018-12-10T00:21:14+5:302018-12-10T00:44:30+5:30
पनवेल रेल्वेस्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि सिडकोने घेतला आहे. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे; परंतु यात परिसरातील झोपड्यांचा अडथळा येत असल्याने या झोपड्यांचे रेंटल हाउसिंग योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : पनवेलरेल्वेस्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि सिडकोने घेतला आहे. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे; परंतु यात परिसरातील झोपड्यांचा अडथळा येत असल्याने या झोपड्यांचे रेंटल हाउसिंग योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे. रेंटल हाउसिंगसाठी सिडको एमएमआरडीएकडे पाठपुरावा करणार आहे. या पुनर्वसनाच्या खर्चाचा संपूर्ण भार मध्य रेल्वे उचलणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा ‘नैना’ प्रकल्प, मेट्रोचे जाळे, जेएनपीटीचा विस्तार तसेच शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक व नेरुळ-उरण रेल्वे आदीमुळे रायगड जिल्ह्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. सध्याच्या पनवेल स्थानकातून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. भविष्यात या स्थानकांवर ताण वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यानंतर या स्थानकाला आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच ‘नैना’ क्षेत्राच्या संपूर्ण विकासानंतर सध्याच्या पनवेल स्थानकाला मर्यादा पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर काळाची गरज म्हणून पनवेल स्थानकाचा मेकओव्हर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव मध्य रेल्वेला सादर करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मान्यतेनंतर स्थानकाच्या विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. स्थानकात अतिरिक्त तीन फलाट वाढविण्यात येणार आहेत. तसेच सीएसटीच्या पार्श्वभूमीवर स्थानकाचा विकास करण्याची योजना आहे. याचा संपूर्ण खर्च सिडको व मध्य रेल्वे करणार आहे. असे असले तरी स्थानक परिसरात सुमारे ८५० झोपड्या आहेत. या झोपड्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सिडको व मध्य रेल्वेने संयुक्त अहवाल तयार केला आहे. पुनर्वसनासाठी एमएमआरडीएच्या रेंटल हाउसिंग योजनेतील घरे मिळवून देण्याची तयारी सिडकोने दर्शविली आहे; परंतु त्याचा संपूर्ण खर्च रेल्वेला उचलायचा आहे. रेल्वेने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’ला सांगितले. झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
फलाटांची संख्या वाढणार
पनवेल स्थानक मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. कोकण मार्गे जाणाऱ्या सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या या स्थानकात थांबतात. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस तसेच विदर्भ, मराठवाड्यात जाणाºया सर्व गाड्यांचा या स्थानकात थांबा आहे.
या स्थानकात एकूण सात फलाट असून, त्यापैकी चार उपनगरीय तर तीन लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. यात आणखी तीन फलाटांची वाढ करून सुविधांचा विस्तार केला जाणार आहे.
सिडको, रेल्वेचे संयुक्त उपक्रम : पनवेल रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरणासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आला आहे. यात सिडकोचा ६७ टक्के तर रेल्वेचा ३३ टक्के सहभाग असणार आहे. झोपड्यांच्या पुनर्वसनाचा संपूर्ण खर्च मात्र मध्य रेल्वेने उचलायचा आहे. हा खर्च २५ कोटी रुपयांच्या घरात आहे.