चिपळूण : मेक इन इंडियाची घोषणा करून मोठी रोजगारनिर्मिती करण्याची स्वप्न आपल्याला सरकारने दाखवली. ही स्वप्न पूर्ण करण्याची महत्त्वाची जबाबदारी अवजड उद्योग खात्यावर आली; पण मेक इन इंडियाच्या अंतर्गत किती कारखाने भारतात आले, किती रोजगारनिर्मिती झाली हे अवजड उद्योगमंत्री खा. अनंत गीते सांगू शकतील काय? आपल्या मतदारसंघात जो कागदाचा कारखाना आणणार होता त्याचे काय झाले? ते तरी सांगा, असे प्रश्न उपस्थित करत तटकरे यांनी खा. गीतेंचा समाचार घेतला. मंगळवारी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे, कापरे आणि कळवंडी येथे झालेल्या आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
तटकरे म्हणाले, मी छाती ठोकपणे सांगू शकतो की, रोहा एमआयडीसी असेल किंवा मतदारसंघातील कोणतीही एमआयडीसी असो, तिथे विविध कारखाने आणून हजारो तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न माझ्यामार्फत झाला आहे. श्रीवर्धन येथील दिवेआगर गावाला खा. गीतेंनी दत्तक घेतले. नारळी, पोफळीच्या मुबलक बागा असलेले, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले हे जवळपास चार-साडेचार हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात गीतेंनी फक्त सीएसआर फंडातून सार्वजनिक शौचालये बांधण्याचे काम केले आहे. या व्यतिरिक्त गेल्या दहा वर्षांत या गावासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. एवढेच काय तर दिवेआगर येथील चोरीला गेलेली प्रसिद्ध सुवर्णगणेशाची प्रतिमा सापडली, तेव्हा त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मी निधी मिळवून दिला असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
मुरुड येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता, तिथे २० कोटी रुपयांचा निधी देऊन तिथल्या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी काम केले आहे. येथील विविध समाजांसाठी आपण समाजमंदिरे उभारली आहेत, याचाही उल्लेख तटकर यांनी केला. संपूर्ण माणगाव शहरात खासदार निधीतून गीतेंनी केवळ एक सार्वजनिक शौचालय साडेसतरा लाख रु पये खर्च करून बांधले आहे. खासदाराकडून लोकांना अपेक्षा असतात. रस्त्यांची कामे, सागरी महामार्गाचे काम, जेट्टीचे काम, बाजारपेठा, गावागावांत मोबाइल कनेक्टिव्हिटी अशा अनेक गोष्टी खासदाराच्या माध्यमातून व्हायला हव्यात, असेही ते म्हणाले. या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला, या वेळी गुहागरचे आमदार भास्कर जाधव उपस्थित होते.