अलिबाग : आयुष्यातील करिअरचा महत्त्वाचा टप्पा असणाºया बारावी परीक्षेचा प्रारंभ बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) बारावी परीक्षेकरिता जिल्ह्यात ४२ परीक्षा केंद्रांवर ३२ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.येत्या १ मार्चपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) दहावीची परीक्षा प्रारंभ होणार आहे. दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यात ६९ परीक्षा केंद्रे असून, त्यावर ३९ हजार ५५९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा व गैरमार्ग प्रकरणास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.परीक्षेला जाताना, परीक्षा हॉलमध्ये व परीक्षेनंतर काय करावे, याचे असंख्य मेसेज वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये फिरताहेत; पण यात एक मुद्दा सगळेच विसरताहेत तो म्हणजे तुम्ही आनंदी राहा. पेपरच्या टेन्शनने मूड बदलण्याची शक्यता असते. तेव्हा सतत पेपर, परीक्षा, मार्क याचा विचार करू नका. आपला पेपर चांगला जाणार आहेच, हा विचार मनात कायम ठेवा, सकारात्मक विचार करा व नकारात्मक विचारांना दूर करा, असे आवाहन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना समुदेशक ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी केले.
जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:36 AM