रायगडच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:43 AM2020-06-09T00:43:36+5:302020-06-09T00:43:42+5:30
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : कोरोनाचा पडला विसर
अलिबाग : सोमवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांच्या या आततायीपणामुळे पोलीस प्रशासनही या रांगा बघून हतबल झाल्याचे दिसले. बाजारपेठा, दुकाने या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याबाबतचे नियम धाब्यावर बसवण्यात आले.
नागरिक कुठलेही कारण सांगून घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी अशी गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार कसा रोखणार, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र शासनाकडून देशभरातील लॉकडाऊनमध्ये ३० पर्यंत वाढ केली होती. रायगड जिल्ह्यातील काही भागातच कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून घरांमध्ये अडकून पडलेले नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. खरेदीसाठी त्यांनी दुकानांबाहेर गर्दी केली होती. काहीच दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच वादळही येऊन गेल्याने घरांच्या छपरावर ताडपत्री, प्लॅस्टिकचा कागद टाकणे गरजेचे असल्याने अशा वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याचे दिसत होते. मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी असल्याने एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखण्यात त्यांना अपयश आले अथवा तो नियम त्यांनी पायदळी तुडवल्याचे स्पष्ट दिसत होते.
एका रस्त्यावरील किंवा गल्लीमधील दुकानातही गर्दी केली जात आहे. त्याचबरोबर सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच ही दुकाने सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित कालावधीमध्ये संचारबंदी लागू राहणार आहे.
सरकारी कार्यालयांसह विविध खासगी कंपन्या, खाजगी कार्यालयांमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ओसाड पडलेल्या रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. मार्केटमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीसही वेळोवेळी बाजारपेठेत जाऊन नागरिकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन करीत होते.