पाच दिवस बाजारपेठ बंद असल्याने खोपोलीत प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:44 AM2021-05-08T00:44:11+5:302021-05-08T00:44:28+5:30
सामाजिक अंतराचे तीनतेरा : गर्दी रोखण्याचे प्रशासनाचे नियोजन शून्य
लोकमत न्यूज नेटवर्क
खोपोली : भाजी मार्केट पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी पाच दिवस भाजी मार्केट बंद ठेवण्याचे पत्र दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी सातपासून बाजारपेठेमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे सामाजिक अंतराचे तीनतेरा उडाले.
गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे भाजी मार्केटच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यांवरही प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. शासनाने जर सकाळी सात ते अकरा ही वेळ मार्केट उघडायची दिली आहे, तर भाजी मार्केटचे पदाधिकारी सलग पाच दिवस मार्केट कसे बंद ठेवू शकतात?अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. याबाबत पोलिसांनी व प्रशासनाने तोडगा काढणे आवश्यक असल्याची मागणी जोर पकडत आहे.
बंदचा निर्णय अन्यायकारक
कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण देत भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय हा ग्राहकांवर अन्याय करणारा आहे. तसेच शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे .त्यामुळे प्रशासनाने आणि पोलिसांनी यामध्ये त्वरित हस्तक्षेप करून भाजी मार्केट बंद मागे घेण्यास भाग पाडावे आणि भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक भागामध्ये भाजीविक्रेते बसवावेत म्हणजे मार्केटमध्ये गर्दी उसळणार नाही.
- संजय पाटील,
जनजागृती ग्राहक मंचचे
खोपोली शाखेचे अध्यक्ष