वाकण-खोपोली मार्गावर कामामुळे धुळीचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:21 PM2019-10-18T23:21:47+5:302019-10-18T23:22:01+5:30

वाहनचालक, प्रवाशांचे आरोग्य धोक्यात : रस्ता रुंदीकरणाचे काम वेगात

huge dust due to work on the Wakan-Khopoli route | वाकण-खोपोली मार्गावर कामामुळे धुळीचे साम्राज्य

वाकण-खोपोली मार्गावर कामामुळे धुळीचे साम्राज्य

Next

विनोद भोईर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाची रुंदीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. हे कामे सुरू असताना येथील मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक, व्यावसायिकांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत.


मार्गावर वाकण ते पाली, रासळ, चिवे, परळी, दुधाणवाडी, उंबरे, शेबडी, मिरकुट वाडी ते पाली फाटा या ठिकाणी धुरळ्याची सर्वात अधिक समस्या आहे. मोटारसायकलस्वारांचे धुळीमुळे हाल होत आहेत.
या मार्गावरून जाताना दुचाकीस्वारांचा धुळीशी थेट संबंध येतो. हेल्मेट घातलेले असतानासुद्धा नाकातोंडात धूळ जाते. श्वसनाचे विकार असलेल्यांसह लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. तर धुरळा उडत असल्याने समोरून ये-जा करणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे.


पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती आणि खडीचा वापर केला होता. आता यावरून वाहने जाऊन येथून धूळ बाहेर उडत आहे. याचा त्रास वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांना होत आहे, तसेच महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व रहिवासीही धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. हा धुरळा वाहनचालक आणि प्रवाशांच्या अंगावर सर्वत्र बसतो. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे या धुळीमुळे हाल होत आहेत. वारंवार उडणारी धूळ खाद्यपदार्थ आणि वस्तूंवरही बसते. त्यामुळे सतत साफसफाई करावी लागते. हॉटेलमधील खाद्य पदार्थ, दुकानातील व घरातील वस्तू आणि उपकरणे धुळीमुळे खराब होतात. त्यामुळे या मार्गाचे काम जलद गतीने करण्याची मागणी व्यावसायिक, चालक व प्रवाशांकडून होत आहे. मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने समोरून येणारी व जाणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच धुरळा उडू नये म्हणून माती बसण्यासाठी पाणीही टाकले जात नाही. जागोजागी मातीचे ढिगारे रचून ठेवले आहेत.


ही धूळ वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांच्या नाकातोंडात जाऊन त्याचा त्यांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांना आणि परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे आजार होत आहेत.
 

या मार्गावर धुरळ्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. येथील धुळीच्या समस्येवर काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- बाळा यादव, मिनीडोअर चालक
धुरळ्यावर उपाययोजना करत आहोत. बुधवारपासूनच मार्गावर असलेले खड्डे खडी व डांबराने भरण्यास सुरुवात केली आहे. धुरळ्याची समस्या कमी होईल. लवकरच रस्त्याचा बराचसा भाग पूर्ण करणार आहोत.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

Web Title: huge dust due to work on the Wakan-Khopoli route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.