देवकान्हेतील वणव्याने वनसंपदेची प्रचंड हानी; उडदवणे गावालगतच्या घरांना झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:47 AM2021-03-27T01:47:58+5:302021-03-27T01:48:06+5:30
हिरव्या डोंगराचा अक्षरशः कोळसा झाला होता. वन्यजीव जळून गेले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या वनविभागाला हे दिसलेच नाही.
धाटाव : रोहा तालुक्यातील देवकान्हे गावच्या हद्दीतील डोंगरावर लागलेली आग, वाळलेले गवत व झाडीमुळे उडदवणे गावच्या हद्दीत येऊन पोहोचली. गावालगतच्या घरांनाही त्याची झळ बसली. इतकेच नाही तर ही आग कालव्याच्या पलीकडे जाऊन पोहोचली. उडदवणे गावच्या ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळविले; परंतु तोपर्यंत कित्येक हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले होते.
रोह्यात उन्हाची काहिली प्रचंड वाढत आहे. डोंगरावर लागणाऱ्या वणव्यांमुळे जैवविविधता जळून खाक होत आहे. मात्र, वनसंपदा संरक्षण व जोपासना करण्यासाठी शासनाने नेमलेल्या वनविभागातील कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या गांभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी संबंधित विभागाकडे वेळ नसल्याचे या नुकत्याच लागलेल्या वणव्यावरून पाहावयास मिळते.
हिरव्या डोंगराचा अक्षरशः कोळसा झाला होता. वन्यजीव जळून गेले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या वनविभागाला हे दिसलेच नाही.
वन्यजिवांचे रक्षण करणारे हे वनकर्मचारी काय करतात, याचासुद्धा विचार व्हायला हवा. रोहा तालुक्यात गेले कित्येक दिवस रोजच वणवे लागत आहेत. मात्र, हे नैसर्गिक नाहीत. वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना शासन केले गेले असते तर आज झालेली हानी थांबवता आली असती. मात्र, वनविभाग कर्मचऱ्यांना याबाबत गांभीर्य नाही. याच परिसरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी केलेली वृक्ष लागवड ही अशीच वणव्याच्या भक्ष्यस्थानी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली होती. ज्या गरीब शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही शासनाने योग्य तो मोबदला द्यावा व अशा आगी परत लागणार नाहीत यासाठी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.