माणगाव : पोलीस म्हटले की, त्याच्याबद्दल गैरसमज जास्त असतात वा भीती असते. पण तेही एक माणूस आहेत, त्यांना भावना असतात. त्यांच्यातही माणुसकी असते. त्यांना दुसऱ्याला समजून घेण्याची गरज असते. अशाच खाकी वर्दीतील माणसाने मानसिक संतुलन ढासळलेल्या एका अबलेला सुरक्षित तिच्या घरी पोहचवले.गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ठाणे अंमलदर गणेश पवार यांना बुधवारी २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता फोन आला की गोरेगाव-लोणेरे दरम्यान असणाऱ्या रेल्वे पुलाखाली एक महिला पडली आहे. हा फोन येताच त्यांनी आपली सहकारी महिला पोलीस रेखा पाशिलकर यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले असता एक महिला विवस्त्र निपचित पडलेली दिसली. गणेश पवार यांनी रेखा पाशिलकर यांच्या मदतीने तिच्या अंगावर चादर टाकली. बाजारातून तिला स्वखर्चाने कपडे तिला दिले. ती उपाशी असल्याने अंगात ताकद नव्हती. चार दिवस काही न खाल्ल्याने तिला चक्कर येवून पडली होती. पवार यांनी तिची नाश्ताची व्यवस्था केली आणि तिला दवाखान्यात नेवून उपचार देखील केले. त्यातच या महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने तिला काहीच आठवत नव्हते. या परिस्थितीत तिच्या पर्समध्ये चिठ्ठीवरून पोलिसांनी तिच्या आईला फोन लावून आई व तिच्या भावाच्या ताब्यात दिले. या सर्व घटनेतून खाकी वर्दीतील माणुसकी पाहायला मिळाली. पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी देसाई, सानप, गाडी चालक जंगम यांनी महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेतला. (वार्ताहर)
माणगावात खाकी वर्दीतील माणुसकी
By admin | Published: March 25, 2017 1:28 AM