कर्जत नगरपरिषद हद्दीत शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:12 AM2018-06-28T02:12:39+5:302018-06-28T02:12:42+5:30
राज्य सरकारने २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदी केली आहे, मात्र कर्जत नगरपरिषद हद्दीत प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी जानेवारी २०१८ पासून झाली होती
कर्जत : राज्य सरकारने २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदी केली आहे, मात्र कर्जत नगरपरिषद हद्दीत प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी जानेवारी २०१८ पासून झाली होती. शंभर टक्के प्लॅस्टिकबंदीसाठी नागरिक, दुकानदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचे श्रेय मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना आणि जनतेला जात आहे.
कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या रामदास कोकरे यांनी पहिल्या दिवसापासून प्लॅस्टिक पिशवीला विरोध केला आणि नगरपरिषद हद्दीत ओला आणि सुका कचरा संकलन केला जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सुरवातीस याला विरोध झाला. मात्र आज नगरपरिषद हद्दीतील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा होतोय. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभा आहे आणि त्यापासून वीजनिर्मिती होत असून बायोगॅस प्रकल्पाच्या बाजूचा रेल्वे पूल ते उल्हास नदी या रस्त्यावरील पथदिवे या माध्यमातून पेटत आहेत.
दूध डेअरीवाल्यांनीही प्लॅस्टिक पिशव्या बंद केल्या आहेत. आता डेरीत किटल्या ठेवल्या आहेत. ग्राहकांनी किटली आणली नाही तर डेरी मालक १०० रुपये डिपॉझिट घेवून किटलीत दूध देतो. किटली परत दिल्यावर डिपॉझिट परत अशा पध्दतीने सध्या दूधडेरीचा व्यवसाय सुरू आहे. प्लॅस्टिक पिशवी बंद असल्याचा फलक सुद्धा लावला आहे आणि ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन फलकांव्दारे केले आहे. मात्र याचा परिणाम दूध विक्रीवर झाला आहे.
नगरपरिषदेच्या ओला आणि सुका कचरा संकलनामुळे कर्जत हद्दीत डंपिंग ग्राउंड राहिले नाही. वेगवेगळ्या कचरा संकलनामुळे नगरपरिषदेला उत्पन्न मिळणे सुरू झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने आता कचरा संकलनासाठी सहा नवीन मिनी गाड्या खरेदी केल्या आहेत.